माळंदा येथे ‘खेत बचाओ अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

25

माळंदा येथे ‘खेत बचाओ अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद
– पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR) तंत्रज्ञानाची शेतकऱ्यांना माहिती
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०२ : कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने माळंदा (ता. धानोरा) येथे खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत आयोजित या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने पेरणी यंत्राद्वारे भात लागवड (DSR) पद्धत, माती परीक्षण, बीज प्रक्रिया तसेच बीज उगवणक्षमता चाचणी यांचे प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घेतल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी DSR पद्धतीचा अवलंब करण्यास सकारात्मक प्रतिसाद देत पेरणी यंत्रांची मागणी नोंदविली.
तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण सरोगदे यांनी मार्गदर्शन करताना रासायनिक खतांचा अतिरेक टाळून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. जमिनीची सुपीकता आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, दशपर्णी अर्क यांसारख्या सेंद्रिय घटकांचा वापर करावा, तसेच हिरवळीची व कंपोस्ट खते वापरून पीक फेरपालट पद्धतीचा अवलंब करावा, असे त्यांनी सांगितले.
मंडळ कृषी अधिकारी संतोष चलाख यांनी DSR पद्धतीची सविस्तर माहिती देताना या तंत्रज्ञानामुळे चिखलणी व रोवणीचा मोठा खर्च वाचत असल्याचे सांगितले. उपकृषी अधिकारी प्रवीण मोहुर्ले यांनी बीज प्रक्रिया आणि बीज उगवणक्षमता तपासणीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला सरपंच अशोक बढाई, तुकाराम मडावी, रामचंद्र बढाई, जय गुरुदेव शेतकरी गटाचे सदस्य तसेच मोरेश्वर पदा, अमरू बढाई, कृष्णा भूरकुर्या यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन पी. के. जनबंधू (BTM, आत्मा), दुर्गा उसेंडी आणि आकाश मडावी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजाराम मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here