ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी धानोऱ्यात एल्गार ; जनगणनेवर बहिष्काराचा इशारा
– नगराध्यक्ष-उपाध्यक्षांचा जाहीर पाठिंबा
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २४ : आगामी जनगणनेमध्ये ओबीसी समाजाची स्वतंत्र जातनिहाय गणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी धानोरा येथील ओबीसी समाज आक्रमक झाला असून, शासनाने मागणीकडे दुर्लक्ष केल्यास संपूर्ण जनगणना प्रक्रियेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन २२ मे २०२६ रोजी धानोरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
ओबीसी समाजाच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा देण्यात आला असून, स्वतंत्र जातनिहाय जनगणना न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा निर्धार समाज बांधवांनी व्यक्त केला.
निवेदन सादर करताना धानोरा नगरपंचायतीचे लोकप्रतिनिधी व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये नगरसेवक राजु मोहुर्ले, नगरसेविका देवांगणिताई चौधरी, कल्याणिताई गुरनूले, माजी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे यांनी पुढाकार घेतला. तसेच गुरु सोनुले, मंगल मोहुर्ले, सत्यवान गुरनूले, सूरज कोकोडे आणि सौरव सहारे यांनीही उपस्थित राहून प्रशासनासमोर समाजाची भूमिका ठामपणे मांडली.
या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नेतृत्वाने या भूमिकेला उघड पाठिंबा दिला आहे. धानोरा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पोर्णिमाताई सयाम आणि उपाध्यक्ष ललीतजी बरछा यांनी ओबीसी समाजाच्या आंदोलनाला जाहीर समर्थन दिले. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही पाठबळ दिल्याने तालुक्यातील ओबीसी चळवळीला नवी ताकद मिळाली असून, या आंदोलनाचा आगामी जनगणना प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, धानोरा तालुक्यात या भूमिकेमुळे राजकीय आणि सामाजिक चर्चांना वेग आला असून, शासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














