गडचिरोली : बनावट नंबर प्लेटचा वापर करून अवैध दारू वाहतूक, 14.87 लाखांचा मुद्देमाल जप्त
The गडविश्व
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही छुप्या पद्धतीने अवैध दारू वाहतूक व विक्रीचे प्रकार सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नंबर प्लेट लावून अवैध दारू वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून, चारचाकी वाहनासह तब्बल 14 लाख 87 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत 21 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली आणि पोलीस स्टेशन अहेरीच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर एक संशयित व्यक्ती बोलेरो कॅम्पर वाहनातून देशी-विदेशी दारूची अवैधरित्या वाहतूक व विक्री करण्यासाठी थांबलेली आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसह घटनास्थळी सापळा रचून छापा टाकला.
कारवाईदरम्यान एमएच 12 एसएक्स 6981 क्रमांकाची काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर संशयास्पद अवस्थेत आढळून आली. पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अवैध दारूचा साठा आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये हायवर्ड्स 5000 बिअरचे 1,104 कॅन, रॉकेट संत्रा देशी दारूच्या 2,200 निपा, तसेच रॉयल स्टॅग डिलक्स व्हिस्कीचे 120 बॅरल यांचा समावेश आहे. याशिवाय दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले बोलेरो कॅम्पर वाहनही जप्त करण्यात आले.
दारूसाठा आणि वाहन मिळून एकूण 14,87,200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे, संबंधित वाहनावर बनावट नंबर प्लेट लावून अवैध वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अरुण फेगडे आणि अहेरी पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
दारूबंदी असलेल्या गडचिरोलीत अवैध दारू माफियांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #aheri #localnees #breakingnews














