झाडीबोलीचा गोडवा शब्दांतून; संगीता ठलाल यांच्या ‘झाडीचा खाजा’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

61

झाडीबोलीचा गोडवा शब्दांतून; संगीता ठलाल यांच्या ‘झाडीचा खाजा’ काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १८ : देऊळगाव येथील मूळ रहिवासी तथा सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असलेल्या साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल यांच्या ‘झाडीचा खाजा’ या झाडीबोली काव्यसंग्रहाचे प्रकाशन, कविसंमेलन आणि विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभाचा सोहळा महादेवगड-अरततोंडी येथील गट ग्रामपंचायत सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई अलाम होत्या, तर उद्घाटक म्हणून नाट्यलेखक व दिग्दर्शक डॉ. सदानंद बोरकर उपस्थित होते. पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाष्यकार डॉ. धनराज खानोलकर, प्रा. राजकुमार मुसणे, प्रा. भाऊराव पत्रे, अमृत ठलाल, मिनाक्षी सेडमाके, गीता लोहंबरे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते. दुसऱ्या सत्रातील कविसंमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ हास्यकवी एकनाथ बुध्दे यांनी भूषविले.
ग्रामीण परंपरेनुसार मान्यवरांचे पाय धुऊन स्वागत करण्यात आले. खरमतटोला येथील विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. नैसर्गिक बहाव्याच्या पुष्पगुच्छांसह सन्मानचिन्ह देऊन उपस्थितांचा गौरव करण्यात आला. यावेळी सदानंद बोरकर व राजकुमार मुसणे यांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला.
मान्यवरांच्या हस्ते ‘झाडीचा खाजा’ या झाडीबोली काव्यसंग्रहाचे प्रकाशन मोठ्या उत्साहात झाले. डॉ. धनराज खानोलकर आणि प्रा. राजकुमार मुसणे यांनी संगीता ठलाल यांच्या ‘रोवना’ आणि ‘बोतरी’ या कवितांवर भाष्य करताना त्यांच्या लेखणीतून झाडीबोलीचे अस्सल सौंदर्य आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रभावीपणे उमटल्याचे सांगितले. साहित्य अकादमी दिल्लीचे निमंत्रण, दूरदर्शन सह्याद्री व आकाशवाणी नागपूरवरील मुलाखती हा संपूर्ण झाडीपट्टीसाठी अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटक डॉ. सदानंद बोरकर म्हणाले, “संगीता ठलाल झाडीबोली जिवंत ठेवण्याचे काम करत आहेत. त्या काल्पनिकतेपेक्षा वास्तव अनुभवांना शब्दबद्ध करतात. झाडीपट्टीतील त्या दुसऱ्या बहिणाबाई ठरतील.”
पद्मश्री डॉ. परशुराम खुणे यांनीही संगीता ठलाल यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत, “ही झाडीची लेक संस्कृती जपत समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. ‘झाडीचा खाजा’ भावी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल,” असे गौरवोद्गार काढले.
अध्यक्षीय भाषणात कुसुमताई अलाम म्हणाल्या, “झाडीबोली भाषा समृद्ध झाली पाहिजे. संगीता ठलाल यांनी रानभाज्या, रानऔषधी आणि ग्रामीण संस्कृतीवर संशोधनात्मक लेखन करून समाजजागृती केली आहे. ‘झाडीचा खाजा’ हा केवळ काव्यसंग्रह नसून वेदना, संघर्ष, मेहनत, त्याग आणि आत्मविश्वासाचा ठेवा आहे.”
यावेळी पोलीस भरतीत नव्याने निवड झालेल्या सूरज दखणे यांचा तसेच आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेले प्रकाश मेश्राम, कुसुम मुंगणकर, एकनाथ बुध्दे, बचत गटातील महिला आणि स्वागतगीत सादर करणाऱ्या विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.
दुसऱ्या सत्रात कविसंमेलन रंगले. नंदकिशोर नैताम, रमेश कोरचा, शिल्पा पाटील, विश्वंभर गहाणे यांच्यासह गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व सहभागी कवींना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान संगीता ठलाल यांनी गट ग्रामपंचायत अरततोंडी सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. शेवटी ग्रामीण परंपरेनुसार भोजन व नाश्त्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रुजेश्वर गहाणे, ईश्वर ठाकरे आणि वासुदेव लोहंबरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आयोजन संगीता संतोष ठलाल यांनी केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन मुरलीधर कवाडकर यांनी, तर कविसंमेलनाचे सूत्रसंचालन अमोल मेश्राम यांनी केले. आभार राकेश खुणे यांनी मानले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here