रेती घोटाळ्याने खळबळ ; गुरनोली-घाटी प्रकरणी चौकशी समिती गठित, दोषींवर कारवाईची तलवार

28

रेती घोटाळ्याने खळबळ ; गुरनोली-घाटी प्रकरणी चौकशी समिती गठित, दोषींवर कारवाईची तलवार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : जिल्ह्यातील गुरनोली व घाटी येथील राखीव रेतीघाटांमधून घरकुल लाभार्थ्यांसाठी आरक्षित असलेली वाळू खाजगी कंत्राटदारांना पुरवण्यात आल्याच्या गंभीर तक्रारीमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सखोल चौकशीसाठी विशेष समिती गठित केली असून, दोषींवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
माध्यमांतून उघडकीस आलेल्या या प्रकरणात घरकुल लाभार्थ्यांच्या हक्काची वाळू नियमबाह्य पद्धतीने वळवण्यात आल्याचे आरोप आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित यंत्रणांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोषींवर कारवाईची तलवार

चौकशी समितीच्या अहवालानुसार जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कारवाईची तलवार लटकत आहे.

‘महाखनिज’ प्रणालीत बदलाचे निर्देश

भविष्यात अशा प्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘महाखनिज’ प्रणालीत तांत्रिक बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. स्थानिक रहिवासी (वैयक्तिक वापर) आणि घरकुल लाभार्थी यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही शासकीय प्रकल्पांसाठी वाळू देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी आवश्यक करण्यात येणार आहे. यासाठी मे. शौर्या टेक्नोसॉफ्ट प्रा. लि., पुणे यांना आवश्यक सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोठ्या प्रमाणात रेती वितरण

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, आतापर्यंत मोठ्या प्रमाणात वाळू वितरण करण्यात आले आहे.
स्थानिक रहिवासी : 1,771 लाभार्थ्यांना 14,246 ब्रास वाळू
घरकुल लाभार्थी : 32,129 लाभार्थ्यांना 1,61,320 ब्रास वाळू

सध्याच्या नियमांनुसार, स्थानिक वापरासाठी 600 रुपये स्वामित्वधन भरून वाळू दिली जाते, तर घरकुल लाभार्थ्यांना कमाल 5 ब्रासपर्यंत वाळू विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. ही प्रक्रिया जिल्ह्यातील तहसीलदारांच्या स्तरावर सुरू आहे.
गुरनोली-घाटी रेती प्रकरणामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले असले, तरी चौकशी समितीच्या अहवालातून सत्य समोर येईल का आणि दोषींवर प्रत्यक्षात कारवाई होईल का, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here