गडचिरोलीत भूसंपादनाचा वाद पेटणार? आंदोलनाच्या शक्यतेने प्रशासनाने उद्यापासून ‘हा’ रस्ता केला बंद
– अत्यावश्यक सेवा वाहनांना सूट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ९ : कोनसरी परिसरातील लोह प्रकल्पासाठी होणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन आंदोलन भडकण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने खबरदारीचा मोठा निर्णय घेतला आहे. येनापूर–जयरामपूर मार्गावरील वाहतूक १० ते १४ मार्च २०२६ या कालावधीत पाच दिवसांसाठी तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले आहेत.
आष्टी पोलीस ठाणे हद्दीतील कोनसरी येथे लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचा लोह प्रकल्प सुरू असून या प्रकल्पासाठी मुधोली चक नं. २, पारडी देव (रिठ) आणि जयरामपूर येथील खाजगी तसेच शासकीय जमिनीचे मोजमाप व भूसंपादन प्रक्रिया ११ मार्चपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांकडून आंदोलन, निदर्शने किंवा विरोध प्रदर्शन होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५ व ११६ अन्वये येनापूर ते जयरामपूर मार्गावर दोन्ही बाजूंनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र प्रवासी बस, पाणीपुरवठा, महावितरण, दूरसंचार तसेच रस्ते दुरुस्तीशी संबंधित अत्यावश्यक सेवा वाहनांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध भारतीय दंड संहिता १८६० तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना देण्यात आले आहेत.
भूसंपादन प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची चर्चा सुरू झाली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













