हिंदू समाजाने संघटित होऊन सांस्कृतिक मूल्ये जपावीत : ह.भ.प. विनोद बिहारी गोस्वामी महाराज
– राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त कुरखेड्यात भव्य कलश यात्रा व हिंदू संमेलन उत्साहात
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०६ : हिंदू समाजाने संघटित होऊन सांस्कृतिक मूल्ये जपावीत असे प्रतिपादन ह.भ.प. विनोद बिहारी गोस्वामी महाराज
यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने सकल हिंदू समाज मंडळ, कुरखेडा यांच्या वतीने रविवारी (१ मार्च) भव्य कलश यात्रा व हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी केले. यावेळी शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत विविध धार्मिक झाक्या, भजन दिंडी, कलश यात्रा आणि आदिवासी नृत्यांच्या सादरीकरणामुळे वातावरण भक्तिमय व उत्साहपूर्ण झाले.
कार्यक्रमाची सुरुवात कुरखेडा येथील हनुमान मंदिरातून दुपारी १ वाजता शोभायात्रेने झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत ही शोभायात्रा श्रीराम नगर येथील श्रीराम मंदिरात पोहोचली. शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांच्या झाक्यांसह विविध धार्मिक व ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले. या माध्यमातून हिंदू संस्कृतीची परंपरा, शौर्य आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडले. मार्गात विविध ठिकाणी सरबतचे वितरण करण्यात आले.
शोभायात्रेनंतर श्रीराम मंदिर परिसरात धर्मध्वजारोहण व गोमाता पूजन करून हिंदू संमेलनाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी हरिभक्त परायण पंडित विनोद बिहारी गोस्वामी महाराज यांनी उपस्थित हजारो हिंदू बांधवांना संबोधित करताना हिंदू संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले. “सर्व हिंदूंनी जात-पंथ भेद बाजूला ठेवून ‘आम्ही सर्व हिंदू आहोत’ या भावनेतून संघटित व्हावे. कौटुंबिक व सामाजिक एकता जपली तरच सांस्कृतिक मूल्यांचे रक्षण होऊन राष्ट्र सर्वांगीण प्रगतीकडे वाटचाल करू शकते,” असे त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक जोशी यांनी संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याचा आढावा घेत व्यक्तीनिर्मिती, सेवा कार्य, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात पंडित द्वारकाप्रसाद मिश्रा महाराज, ह.भ.प. अविनाश दुबे महाराज आदी मान्यवरांची उपस्थिती होती. भारत मातेची आरती करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कलश यात्रेत मोठ्या संख्येने महिला भगिनी सहभागी झाल्या होत्या.
या कार्यक्रमाला माजी आमदार कृष्णा गजबे, वामनराव फाये, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाग्यवानजी खोब्रागडे, चांगदेव फाये, जीवन पाटील नाट, रवींद्र गोटेफोडे, आशिष काळे यांच्यासह वारकरी, माळकरी, टाळकरी व विविध संप्रदायातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदू संमेलन आयोजन समितीच्या वतीने महाप्रसाद व भजन-जागरण कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. अविनाश दुबे महाराज यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विनोद नागपूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कुरखेडा येथील आयोजन समिती व स्थानिक नागरिकांनी विशेष सहकार्य केले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













