चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मोहली-चातगाव धान खरेदी केंद्र सुरू

110

चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर मोहली-चातगाव धान खरेदी केंद्र सुरू
– शेतकऱ्यांना दिलासा
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. ०६ : धानोरा तालुक्यातील मोहली आणि चातगाव येथील धान खरेदी केंद्र अखेर चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू करण्यात आले असून परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धानाची मळणी होऊन बराच काळ लोटूनही खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता.
धानोरा तालुक्यात दरवर्षी आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमार्फत मोहली व चातगाव येथे धान खरेदी केली जात होती. मात्र सन २०२५-२६ च्या चालू हंगामात धानाची मळणी होऊन सुमारे चार महिने उलटूनही ही दोन्ही केंद्रे सुरू झाली नव्हती. परिणामी शेकडो शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. बँकेचे कर्ज फेडणे, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवणे तसेच पुढील शेती हंगामाचे नियोजन करणे कठीण झाले होते.
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिकच्या उपप्रादेशिक कार्यालय धानोरा अंतर्गत तालुक्यातील धानोरा व मुरुमगाव येथे टिडीसीमार्फत धान खरेदी केली जात आहे. तसेच रांगी, दुधमाळा, पेंढरी, गट्टा, कारवाफा आणि सुरसुडी येथे आविका मार्फत धान खरेदी सुरू आहे. मात्र मोहली व चातगाव येथे खरेदी केंद्र सुरू न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती.
दरम्यान, दोन्ही केंद्रांवर मागील हंगामातील धान्य मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. योग्य ओटा व गोदामाची व्यवस्था नसल्याने काही धान्य खराब झाल्याचीही माहिती मिळाली. अखेर संचालक मंडळाने धान्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारत हमी दिल्यानंतर संबंधित विभागाने प्रायोगिक तत्त्वावर दोन्ही केंद्रांना धान खरेदी सुरू करण्याची परवानगी दिली.
मोहली खरेदी केंद्राअंतर्गत मोहली, महावडा, चिंगली, सिंसूर, आस्वलपार, जांगदा, मेटे जांगदा, मोडेभट्टी, रामपुरी रिठ आणि मोठा रिठ अशा सुमारे दहा गावांचा समावेश आहे. या परिसरातील सुमारे ७०० ते ८०० शेतकऱ्यांनी सातबारा ऑनलाइन करून धान विक्रीसाठी नोंदणी केली असून सर्व शेतकरी केंद्र सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहत होते.
दरम्यान, मोहली आणि चातगाव केंद्रांना ओट्यावर तसेच गोदामामध्ये धान खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली असून धान्याची योग्य काळजी घेण्याबाबत संस्थेकडून हमीपत्र घेण्यात आले आहे, अशी माहिती उपप्रादेशिक व्यवस्थापक एच. एस. सोनवणे (धानोरा) यांनी दिली.
अखेर खरेदी प्रक्रिया सुरू झाल्याने परिसरातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here