शेतकऱ्यांचा संताप उफाळला : भेंडाळ्यात जमीन अधिग्रहण आदेशाची जाहीर होळी

47

शेतकऱ्यांचा संताप उफाळला : भेंडाळ्यात जमीन अधिग्रहण आदेशाची जाहीर होळी
– निर्णय मागे न घेतल्यास १२ मार्चला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे व मुंडन आंदोलनाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०२ : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित JSW प्रकल्पासाठी सुपीक व उत्पादनक्षम शेतजमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायकारक निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेवरच गदा येत असल्याचा आरोप करत भेंडाळा परिसरातील शेतकरी व नागरिक आक्रमक झाले आहेत.
शासनाने ११ फेब्रुवारी रोजी निर्गमित केलेल्या जमीन अधिग्रहणासंदर्भातील शासन निर्णयाच्या निषेधार्थ भेंडाळा येथे शेतकऱ्यांनी सामुदायिक जाहीर होळी दहन करून संताप व्यक्त केला. “हा विकास नसून शेतकऱ्यांच्या संसाराचा व भविष्याचा नाश आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शासनावर गंभीर आरोप केले. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय, स्थानिक ग्रामसभा विश्वासात न घेता आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता जमीन अधिग्रहण रेटले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “सुपीक जमिनी कवडीमोल दराने बळकावून शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा हा डाव असून, लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारा आहे,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घेतला नाही, तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या १२ मार्च रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो शेतकऱ्यांसह धरणे व मुंडन आंदोलन करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, चामोर्शी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद भगत, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, नेताजी गावतुरे, अनिल कोठारे, माजी जिल्हा परिषद सदस्य कविताताई भगत, दिवाकर निसार, ढिवरू मेश्राम, दिगंबर धानोरकर, विजय लाड, नारायण बांगरे, सदानंद जवादे, पांडुरंग भरे, संजय खेडेकर, भुवनेश्वर चौधरी, धनराज पोरटे, मनोहर तुंबडे, उमाजी ठाकूर, काशिनाथ चौधरी, रोहिदास धोबे, गुरुदास चौधरी, कैलास सातपुते, विकास रायसीडाम, नीलकंठ कुथे, मारुती उमलवार, नरेंद्र जुवारे, सौ. कुंदाताई जुवारे, सुनील कन्नाके, नवनाथ चौधरी, संजय चलाख, दामोदर आभारे, मधुकर ढोबे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने शेतकरी बांधव-भगिनी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here