रस्त्यावर गोरगा, ताडी व सिंदी विक्रीला पूर्णविराम : नियमभंगावर कठोर दंडाची तरतूद

47

रस्त्यावर गोरगा, ताडी व सिंदी विक्रीला पूर्णविराम : नियमभंगावर कठोर दंडाची तरतूद
– भामरागडमध्ये महाग्राम सभा व इलाका पट्टीचा ऐतिहासिक निर्णय
The गडविश्व
गडचिरोली, दि.०२ : भामरागड तालुका येथे वाढते रस्ते अपघात आणि व्यसनाधीनतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी महाग्राम सभा व इलाका पट्टी यांच्या वतीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर बसून होणारी गोरगा, ताडी व सिंदीची विक्री पूर्णतः बंद करण्याचा ठराव संमत करण्यात आला असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. अवैध दारू आणि अमली पदार्थांच्या विक्रीमुळे समाजात व्यसनाधीनता वाढून अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढत असल्याचा मुद्दा इलाका सभेत सविस्तर चर्चेला आला होता. अनेक ठिकाणी आपल्या बांधवांकडूनच रस्त्यालगत गोरगा व ताडी काढून विक्री केली जात असल्याने सामाजिक शिस्त व सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला होता.
या पार्श्वभूमीवर सभेने घेतलेल्या निर्णयानुसार आता कोणालाही रस्त्यावर बसून गोरगा, ताडी किंवा सिंदीची विक्री करता येणार नाही. ज्यांच्याकडे स्वतःची झाडे आहेत त्यांनी संबंधित पदार्थांची विक्री फक्त आपल्या घरातूनच करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले असून, पहिल्यांदा आढळल्यास १० हजार रुपये, दुसऱ्यांदा २० हजार रुपये आणि तिसऱ्यांदा आढळल्यास थेट ५० हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.
सध्या इलाका पट्टी, मुक्तीपथ, गाव संघटना आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यावरील अवैध विक्री जागीच नष्ट करण्याची मोहीम जोरात सुरू असून, भामरागड परिसरातील मुख्य रस्त्यांवर गोरगा, ताडी व सिंदीची विक्री बंद झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या निर्णयामुळे परिसरात शिस्त लागून व्यसनाधीनतेवर आळा बसेल तसेच रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा ग्रामसभेने व्यक्त केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here