कुरखेडा : रुग्णालयासमोर जीवघेणे खड्डे, दोन युवकांनी घेतली जबाबदारी, व्हिडिओ व्हायरल
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २० : कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर National Highways Authority of India (NHAI) च्या सुरू असलेल्या कामादरम्यान निर्माण झालेल्या खोल खड्ड्यांमुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला होता. रुग्णवाहिका, दुचाकीस्वार आणि पादचारी यांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. मात्र प्रशासनाची दखल न घेतली जात असताना दोन स्थानिक युवकांनी स्वतः पुढाकार घेत खड्डे बुजवून जबाबदार नागरिकत्वाचे उदाहरण घालून दिले आहे. या कृतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
विकास मडावी आणि आशिक कुंभरे अशी या दोघांची नावे असून ते चिखली येथील रहिवासी आहेत. स्थानिक आटाचक्कीमध्ये काम करणारे हे युवक दिवसभराची मेहनत आटोपल्यानंतर सायंकाळी फावडे, माती, कोळसा व उपलब्ध साहित्य घेऊन रस्त्यावर उतरले. त्यांनी स्वतःच्या श्रमातून जीवघेणे खड्डे भरून काढले. व्हिडिओमध्ये ते अथक परिश्रम करताना दिसतात.
सध्या कुरखेडा मुख्यमार्गावर रस्ता विस्तारीकरण व देखभाल कार्य सुरू आहे. खोदकामानंतर निर्माण झालेले खड्डे वेळेवर न भरल्याने विशेषतः उपजिल्हा रुग्णालयासमोरील भागात अपघाताचा धोका वाढला होता. रुग्णवाहतूक व आपत्कालीन सेवांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी होती.
“सरकार किंवा NHAI चे काम पूर्ण होण्याची वाट पाहत बसण्याऐवजी आम्ही काहीतरी केले पाहिजे असे वाटले. रुग्णालयासमोर अपघात झाला तर जबाबदारी कुणाची?” असे विकास मडावी यांनी सांगितले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर ‘सिविक सेंस’ आणि ‘जागरूक नागरिकत्व’ यावर चर्चा रंगली आहे. अनेकांनी युवकांचे अभिनंदन करत संबंधित यंत्रणेला तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
दोन सामान्य कामगार युवकांनी दाखवलेली ही सामाजिक जबाबदारी केवळ खड्डे बुजवण्यापुरती मर्यादित नसून, समाजाला जागृत करणारा संदेश देणारी ठरली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews














