कुरखेडात भीषण अपघात : चारचाकीने पाच दुचाकी व सायकल चिरडल्या
– सुदैवाने जीवितहानी टळली, अतिक्रमणांमुळे धोका वाढला
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १९ : देसाईगंज–कुरखेडा मुख्य मार्गावर नव्या बसस्थानकासमोर आज १९ फेब्रुवारी रोजी भरदिवसा भीषण अपघात घडल्याने शहरात खळबळ उडाली. चारचाकी वाहन चालकाला अचानक मिरगीचा झटका आल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच दुचाकी व एका सायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत सर्व वाहने चिरडली गेली असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कुरखेडा येथील एका व्यक्तीचे एमएच ४८ ए ५१४५ चारचाकी वाहन देसाईगंज मार्गे कुरखेडाकडे येत होते. नव्या बसस्थानकासमोर चालकाला अचानक मिरगीचा झटका आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. गाडीने आपला मार्ग सोडत रस्त्याच्या कडेला चहा-पान टपऱ्यांसमोर उभ्या असलेल्या दुचाकी व सायकलवर धडक दिली.
या अपघातात मंगेश मांडवे, हरिश्चंद्र डोमळे, मोहन बोदेले, राधेश्याम पटवारी आणि नरहरी बोरकुटे यांच्या दुचाकींचे तर मुकेश झंवर यांच्या सायकलीचे मोठे नुकसान झाले. घटनेवेळी परिसरात नागरिकांची वर्दळ असतानाही उपस्थितांनी प्रसंगावधान राखत सुरक्षित ठिकाणी धाव घेतल्याने मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, शहरात सध्या मुख्य महामार्गाचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम सुरू आहे. कामामुळे रस्ता काही ठिकाणी अरुंद झाला असून त्यातच मार्गालगत वाढलेले अतिक्रमण गंभीर चिंतेचा विषय ठरत आहे. टपऱ्या, हातगाड्या, अनधिकृत पार्किंग आणि रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिणामी, अशा प्रकारच्या अपघातांची शक्यता अधिकच वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
विशेषतः बसस्थानक परिसर आणि बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी नियमितपणे होत असून प्रशासनाने तातडीने अतिक्रमण हटवून वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करावे, अशी मागणी जोर धरत आहे. संबंधित चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
#thegadvishva #thegadvishva #thegdv #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews #accident














