गडचिरोली : २५०० कोटींची गुंतवणूक, पर्यावरणासह विकासाचा दावा

21

गडचिरोली : २५०० कोटींची गुंतवणूक, पर्यावरणासह विकासाचा दावा
– स्टील प्रकल्पाची जनसुनावणी संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : औद्योगिक विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानल्या जाणाऱ्या सुमारे २५०० कोटी रुपयांच्या एकात्मिक स्टील प्रकल्पासाठी पर्यावरणीय जनसुनावणी मंगळवार १७ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात पार पडली. Varad Ferro Alloys Pvt. Ltd. या कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पामुळे जिल्ह्यात १२०० ते १५०० थेट व अप्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जनसुनावणीत कंपनीने सादरीकरण करताना स्थानिक युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता व तांत्रिक कौशल्यांच्या आधारे प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच प्रकल्प परिसरातील गावांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवण्यात येणार असून पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, रस्ते दुरुस्ती, स्वच्छता आणि स्थानिकांसाठी उपजीविकेच्या संधी वाढविण्यावर भर दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.
पर्यावरणीय बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करत प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी १६५ कोटी रुपये पर्यावरण संरक्षणासाठी भांडवली स्वरूपात राखीव ठेवण्यात आले आहेत. प्रदूषण नियंत्रण प्रणालीच्या देखभालीसाठी दरवर्षी सुमारे १७ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. वायू, पाणी, मृदा आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रणासाठी अत्याधुनिक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला.
प्रकल्प क्षेत्रात २७.६२ हेक्टरवर हरितपट्टा विकसित करण्यात येणार असून हे एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे ३५ टक्के असेल. प्रति हेक्टर २५०० झाडांच्या प्रमाणात सुमारे ६९,०५० झाडांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्रकल्प सीमेजवळ किमान १५ मीटर रुंदीचा संरक्षित हरितपट्टा उभारण्याचे नियोजन आहे.
या जनसुनावणीला , चंद्रपूर येथील प्रादेशिक अधिकारी व पथक उपस्थित होते. अहेरी मतदारसंघाचे आमदार तसेच गडचिरोली मतदारसंघाचे आमदार यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली.
लोकप्रतिनिधींनी गडचिरोली जिल्ह्याला “स्टील हब” बनविण्यासाठी अशा उद्योगांची गरज असल्याचे मत व्यक्त करताना, प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिकांना योग्य मोबदला, रोजगाराची हमी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत पर्यावरणपूरक पद्धतीने उद्योग उभारावा, अशी अपेक्षा नोंदविली.
दरम्यान, रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक प्रगतीच्या आशा निर्माण करणाऱ्या या प्रकल्पाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून विकास आणि पर्यावरण यांचा समतोल प्रत्यक्षात कितपत साधला जातो, याकडे सर्वांचे बारकाईने लक्ष राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here