मासिक पाळीदरम्यान सन्मानपूर्वक निवासाची सोय ; धानोरा तालुक्यात तीन गावांमध्ये महिला विश्रांतीगृहांचे उद्घाटन
The गडविश्व
ता.प्र /धानोरा, दि. १६ : ग्रामीण व आदिवासी भागातील महिलांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मानाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत धानोरा तालुक्यातील पवनी, तोयागोंदी आणि मोहली या तीन गावांमध्ये महिलांसाठी मासिक पाळीदरम्यान सुरक्षित व सन्मानपूर्वक निवासासाठी उभारण्यात आलेल्या विश्रांतीगृहांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
युवा परिवर्तन संस्था, फिनोलेक्स कंपनी, मुकुल माधव फाऊंडेशन आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर, गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे तसेच शिवसेना प्रमुख सुरेंद्रसिंग चंदेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी अभिषेक राय (फिनोलेक्स), यामिनी शेख (मुकुल माधव फाऊंडेशन), विलासजी कांबळे (माँ फाऊंडेशन), दर्शना सावंत (डायरेक्टर, युवा परिवर्तन), प्रशांत मंडावार (मॅनेजर, युवा परिवर्तन), सस्टेन प्लसचे संजय व शुभम यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
युवा परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून धानोरा तालुक्यात आतापर्यंत तब्बल २९ महिला विश्रांतीगृहांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे दुर्गम भागातील महिलांना मासिक पाळीदरम्यान स्वच्छ, सुरक्षित आणि सन्मानपूर्वक सुविधा उपलब्ध होत असून, आरोग्यविषयक जागरूकतेत लक्षणीय वाढ होत आहे.
मान्यवरांनी आपल्या भाषणात ग्रामीण भागात मासिक पाळीविषयी असलेले गैरसमज दूर करून महिलांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच टप्पा ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश उईके यांनी केले, तर अनिकेत गुरनुले यांनी आभार मानले. ग्रामीण भागातील महिलांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora














