मार्कंड्यात रंगणार झाडीपट्टीचा जल्लोष : उद्यापासून तीन दिवसीय नाट्य महोत्सवाची मेजवानी

163

मार्कंड्यात रंगणार झाडीपट्टीचा जल्लोष : उद्यापासून तीन दिवसीय नाट्य महोत्सवाची मेजवानी
The गडविश्व
गडचिरोली, दि. १५ : झाडीपट्टीच्या समृद्ध नाट्यपरंपरेला नवे बळ देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने मार्कंडा येथे तीन दिवसीय भव्य झाडीपट्टी नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १६, १७ व १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा महोत्सव रंगणार असून सर्व नाटके रसिकांसाठी निःशुल्क खुली असणार आहेत.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या महोत्सवामागे झाडीपट्टी रंगभूमीचे जतन, संवर्धन आणि विकास हा प्रमुख उद्देश आहे. पारंपरिक नाट्यकलेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तरुण पिढीत झाडीपट्टी नाटकांविषयी आकर्षण निर्माण करणे आणि स्थानिक कलावंतांच्या कलागुणांना चालना देणे, या व्यापक हेतूने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून, अप्पर सचिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक पांडे यांच्या नियोजनातून या महोत्सवाचे आयोजन साकारले आहे.

तीन दिवस, तीन दमदार नाटके

१६ फेब्रुवारी रोजी ‘रक्षक’ या नाटकाने महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन परमानंद गहाणे यांनी केले आहे.
१७ फेब्रुवारी रोजी ‘अवतार’ हे नाटक सादर होणार असून त्याचे लेखन महेश महेंद यांनी तर दिग्दर्शन शेरू खान आणि सोमनाथ नागवंशी यांनी केले आहे.
महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी,१८ फेब्रुवारी रोजी ‘बापाचे काळीज’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन अशोक दुधकर आणि बाळकृष्ण ठाकूर यांनी केले आहे.
सर्व नाट्यप्रयोग विनामूल्य असून रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून झाडीपट्टीच्या या सांस्कृतिक पर्वाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
झाडीपट्टी रंगभूमीच्या नवचैतन्याचा हा सोहळा गडचिरोलीच्या सांस्कृतिक नकाशावर एक वेगळी छाप उमटविणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here