गडचिरोली : लॉयड्स मेटल्सकडून नगर परिषदेस अत्याधुनिक स्वयंचलित रस्ते स्वच्छता वाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १२ : गडचिरोली शहराच्या स्वच्छता व शाश्वत विकासाला नवी गती देत लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत गडचिरोली नगर परिषदेस आज १२ फेब्रुवारी रोजी अत्याधुनिक स्वयंचलित रस्ते स्वच्छता वाहन प्रदान केले. शहरातील प्रमुख मार्ग स्वच्छ, धूळमुक्त आणि अधिक सुव्यवस्थित ठेवण्यासाठी हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.
नवीन स्वयंचलित स्वच्छता वाहनामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांची सफाई अधिक जलद, कार्यक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीने होणार असून धूळप्रदूषणात लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे, या वाहनाचे संचालन व देखभाल लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडकडून नगर परिषदेसोबत समन्वय साधून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. त्यामुळे या सेवेची सातत्यपूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणी सुनिश्चित होणार आहे.
या अत्याधुनिक यंत्राचे उद्घाटन गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नारोटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास माजी खासदार अशोक नेते, नगर परिषदेचे उपाध्यक्ष निखिल चारडे, आरोग्य व स्वच्छता समितीचे सभापती मुक्तेश्वर कटवे तसेच मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विविध CSR उपक्रमांची माहिती देताना पायाभूत सुविधा विकास, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण संवर्धन आणि समुदाय विकासासाठी कंपनीची ठाम वचनबद्धता अधोरेखित केली. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जिल्ह्यात परिवर्तनात्मक विकास उपक्रमांना गती मिळत असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
उपस्थितांनी नागरिकांना स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि निरोगी गडचिरोली घडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे सांगितले.
लॉयड्स मेटल्सचा हा उपक्रम जिल्हा प्रशासनासोबतच्या सातत्यपूर्ण सहकार्याचा महत्त्वाचा टप्पा ठरत असून स्वच्छ, निरोगी आणि शाश्वत गडचिरोलीच्या निर्मितीकडे उचललेले प्रभावी पाऊल मानले जात आहे.














