जांभुळखेडा तलावावर पक्ष्यांची मेजवानी ; वन विभाग–श्रीराम विद्यालयाचा संयुक्त पक्षी निरीक्षण उपक्रम
– विद्यार्थ्यांना दुर्बिणीतून स्थलांतरित पक्ष्यांचे दर्शन; पर्यावरण संरक्षणाचा संदेश
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १२ : वडसा वन विभागाच्या अंतर्गत वनपरिक्षेत्र कार्यालय कुरखेडा आणि श्रीराम विद्यालय, कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने जांभुळखेडा गावाजवळील मोठ्या तलाव परिसरात पक्षी निरीक्षण (Bird Watching) कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विद्यार्थी, शिक्षक व वन अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाला प्राचार्य नागेश फाये, नागपूरकर, बनसोड, कावळे, राऊत यांच्यासह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. वनपरिक्षेत्र अधिकारी एल. एम. गोपलवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहायक एस. एल. कंकलवार, वनरक्षक कुमारी एस. एन. वालदे (जांभुळखेडा), एम. के. दूधबडे (वडेगाव), एस. डब्ल्यू. गोन्नाडे (कुरखेडा), कुमारी आर. एस. मूडमडिगेला (नर्सरी) तसेच कर्मचारी विवेक गहाणे, विक्की गोबाडे आणि सुनील कोरेटी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुर्बिनीच्या साहाय्याने विद्यार्थ्यांनी तलाव परिसरातील विविध पक्ष्यांचे निरीक्षण केले. यावेळी Greylag Goose, Lesser Whistling Duck, Knob-billed Duck आणि Gadwall हे हिवाळी स्थलांतरित पक्षी आढळले. तसेच पान कावळा, नीलकंठ, मैना, बुलबुल यांसारख्या स्थानिक पक्ष्यांचेही दर्शन विद्यार्थ्यांना घडले. पक्ष्यांचे वैशिष्ट्य, त्यांचे स्थलांतर आणि पर्यावरणातील महत्त्व याबाबत क्षेत्र सहायक एस. एल. कंकलवार यांनी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.
यावेळी वन विभागातर्फे मोहफुल संकलन आणि तेंडूपत्ता कापणी हंगाम सुरू असल्याने जंगलात आग लावू नये, असे आवाहन करण्यात आले. जंगलातील आगीमुळे वृक्षसंपदा, पक्षी, वन्यप्राणी व जैवविविधतेचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
वन विभाग आणि श्रीराम विद्यालय यांच्या या संयुक्त उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम व पर्यावरणाबाबत जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice














