गोसीखुर्द धरणातून विसर्ग वाढणार : वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

220

गोसीखुर्द धरणातून विसर्ग वाढणार : वैनगंगा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०७ : गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात सध्या सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे चिचडोह बॅरेजच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गोसीखुर्द धरणामधून सध्या 160 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत असून, परिस्थिती लक्षात घेता उद्या शनिवार 08 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता एक उभे उचल द्वार उघडून 405 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीत सोडण्यात येणार आहे.
या वाढीव विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता असून, नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे वैनगंगा नदीपात्रात मासेमारी, जनावरे चरण्यास नेणे, नदी ओलांडणे किंवा कोणतेही आवागमन करणाऱ्या नागरिकांनी अत्यंत काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः चिचडोह बॅरेज परिसर, नदीकाठची गावे व शेतकरी बांधवांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी तात्काळ संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.
ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, गडचिरोली यांच्याकडून देण्यात आली असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here