मुरूमगाव येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण ; बालविकासाला नवे बळ

45

मुरूमगाव येथे अंगणवाडी इमारतीचे लोकार्पण ; बालविकासाला नवे बळ
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०४ : तालुक्यातील मुरूमगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत २०२३–२४ मध्ये अभिसरणातून बांधण्यात आलेल्या अंगणवाडी क्रमांक ३ च्या सुसज्ज इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या इमारतीचे लोकार्पण शिवप्रसाद गवर्ना, सरपंच ग्रामपंचायत मुरूमगाव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एम. वानखेडे, संवर्ग विकास अधिकारी, पंचायत समिती धानोरा होते.
कार्यक्रमाला लताताई पुंगाटी (माजी जिल्हा परिषद सदस्य), अजमन रावठे (माजी सभापती, पंचायत समिती धानोरा), लाकडे (विस्तार अधिकारी), जयंत मेश्राम (ग्रामपंचायत अधिकारी), मथनूराम मालिया (उपसरपंच), ग्रामपंचायत सदस्य अभिजीत मेश्राम, तिवारीलाल भोयर, चारुलता मार्गिया, रेखाताई देहारी, कृष्णाबाई भक्ता यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवनाथ टेकाम, वसंत कोलीयारा, बैसाकुराम कोटपरिया (ग्रामकोष समिती), खेमराज खोब्रागडे, मुनीर शेख, आनंद आत्राम आदी उपस्थित होते. तसेच सोनलताई वाघाडे (अंगणवाडी पर्यवेक्षक) व उषा तरमनवार (अंगणवाडी कार्यकर्ता) यांची उपस्थिती लाभली.
मार्गदर्शन करताना एस. एम. वानखेडे यांनी सांगितले की, ० ते ३ आणि ३ ते ६ वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी अंगणवाडी हे मुख्य केंद्र आहे. या वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडीत आणल्यास त्यांच्यात चांगल्या सवयी, शिस्त व प्राथमिक शिक्षणाची ओढ निर्माण होते.
यावेळी शिवप्रसाद गवर्ना यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गुणांकन मिळाल्याने सदर अंगणवाडीची सर्व सुविधा युक्त इमारत तातडीने पूर्ण करून उद्घाटन करण्यात आल्याचे सांगितले. नव्या इमारतीमुळे मुरूमगावातील बालविकास व महिला-सक्षमीकरणाला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here