कोरची : बोगाटोला जंगलातील ‘त्या’ अज्ञात खुनाचा ७२ तासांत छडा; पाच आरोपी अटकेत

161

कोरची : बोगाटोला जंगलातील ‘त्या’ अज्ञात खुनाचा ७२ तासांत छडा; पाच आरोपी अटकेत
– सहा दिवसांची पोलीस कोठडी, प्रेमसंबंधातून रक्तरंजित कट
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : तालुक्यातील कोटरा – बोगाटोला मार्गावरील जंगल परिसरात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाच्या मृत्यू प्रकरणाचा गडचिरोली पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उलगडा करत पाच आरोपींना अटक केली आहे. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने मयताची ओळख पटविणे तसेच गुन्ह्याचा तपास करणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. मात्र पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तपणे केलेल्या तपासामुळे हा गंभीर गुन्हा उघडकीस आला.
३१ जानेवारी २०२६ रोजी बोगाटोला जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाचा चेहरा कुजलेला असल्याने ओळख पटविणे अशक्य झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान वैद्यकीय अहवालात मयताचा मृत्यू मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी पोस्टे कोरची येथे मर्ग दाखल करण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्तीची ओळख जितू कवंर (वय ३०), रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) अशी निष्पन्न झाली.
दरम्यान तपासात असे उघड झाले की, आरोपी शानु पठाण (रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा) याचे मयताच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात जितू कवंर अडसर ठरत असल्याने आरोपीने पूर्वनियोजित कट रचला. जितू कवंर हा खुर्शीपार (ता. कोरची) येथे आलेला असताना आरोपी व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने मानेवर वार करून त्याचा खून केला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात नेऊन अर्धवट पुरून ठेवला.
या प्रकरणी आरोपी शानु पठाण (वय ३६), पुंकेश बोरकर (वय ३२), चंद्रशेखर गुज्जेवार (वय २७), धनपाल मडावी (वय २१), सर्व रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली तसेच सोनाली कवंर (वय २५), रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ.ग.) यांना ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत असून, ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोस्टे कोरचीच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #crimenews #jambhulkheda #kurkheda

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here