न.प. गडचिरोलीत दुखवट्याच्या दिवशीच ‘या’ सभापतींचा पदग्रहण सोहळा ; सभापतीवर टीकेची झोड

145

न.प. गडचिरोलीत दुखवट्याच्या दिवशीच ‘या’ सभापतींचा पदग्रहण सोहळा ; सभापतीवर टीकेची झोड
The गडविश्व
गडचिरोली, दि. ३० : राज्य शासनाने जाहीर केलेल्या तीन दिवसांच्या शासकीय दुखवट्याच्या काळात सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम रद्द ठेवण्याचे स्पष्ट निर्देश असतानाही गडचिरोली नगर परिषदेत बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी दुखवट्याच्या दिवशीच पदग्रहण सोहळा आयोजित केल्याने तीव्र वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे नगर परिषद व राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून, सभापती अनिल कुनघाडकर यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठत आहे.
नगर परिषद सभागृहात आज दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र याच दिवशी बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांनी आपल्या पदाचा पदग्रहण सोहळा पार पाडल्याने शोककाळात सत्तेचा सोहळा साजरा केल्याचा आरोप होत आहे. शासकीय निर्णय आणि लोकभावनांचा हा उघड अपमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या घटनेची कोणतीही पूर्वकल्पना नसताना काही कामानिमित्त नगर परिषद कार्यालयात आलेले नगरसेवक बाळू टेंभुर्णे यांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी थेट सभापती अनिल कुनघाडकर यांच्या कॅबिनमध्ये जाऊन सत्ताधारी पक्षाचा जाहीर निषेध नोंदविला. सभापती व सत्ताधाऱ्यांवर त्यांनी तीव्र शब्दांत टीका करत हा प्रकार असंवेदनशील आणि अशोभनीय असल्याचे स्पष्ट केले.
निषेध करताना टेंभुर्णे म्हणाले की, राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर असताना अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेणे म्हणजे शासनाच्या निर्णयांना व लोकभावनांना पायदळी तुडविण्यासारखे आहे. सत्ताधाऱ्यांनी किमान संवेदनशीलतेचे भान ठेवणे अपेक्षित आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
या प्रकारानंतर गडचिरोली नगर परिषदेत राजकीय वातावरण तापले असून, शासकीय दुखवट्याच्या दिवशी पदग्रहण सोहळा आयोजित केल्याप्रकरणी बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर यांच्या भूमिकेवर तीव्र टीका होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #nagarparishad #Gadchiroli
#GadchiroliMunicipalCouncil #MunicipalPolitics #PoliticalControversy #MourningPeriod
#ViolationOfProtocol#PublicSentiment#LocalPolitics
#ChairmanControversy#AnilKunghadkar
#BalooTembhurne #GovernmentMourning#PoliticalNews #MaharashtraPolitics

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here