मनरेगा बचावासाठी कोरचीत काँग्रेसचा आक्रमक पवित्रा
– कोटरा येथे केंद्र सरकारविरोधात तीव्र निषेध आंदोलन
The गडविश्व
ता.प्र / कोरची, दि. ३० : गोरगरिबांच्या हाताला काम देणारी आणि रोजगाराचा घटनात्मक हक्क बहाल करणारी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) बंद करून केंद्रातील भाजप सरकारने ‘जी राम जी’ योजना लागू केल्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने देशभरात आक्रमक आंदोलन छेडले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरची तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने कोटरा येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
भाजप सरकारने मनरेगा योजनेचे स्वरूप बदलत महात्मा गांधी यांचे नाव कमी केले असून, मजुरांचा काम मागण्याचा कायदेशीर हक्कच हिरावून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ग्रामसभेला असलेले काम मंजुरीचे अधिकार काढून घेण्यात आल्याने ग्रामीण मजुरांचे मोठे नुकसान होत असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.
१९७३ च्या भीषण दुष्काळात राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांनी रोजगार हमी योजनेची पायाभरणी केली होती. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे २००५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी संपूर्ण देशात मनरेगा लागू केली. या माध्यमातून मजुरांना वर्षातून १०० दिवस कामाचा कायदेशीर हक्क मिळाला होता. मात्र सध्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हा हक्क संपुष्टात येत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
कोरची तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रामसुराम काटेंगे, पंचायत समितीच्या माजी सभापती कचरीताई काटेंगे, माजी सरपंच तुलाराम मडावी, सरपंच श्यामलाल घावडे, उपसरपंच जीवन नुरूटी, पंजाबराव ऊइके, दामेसाय कोवाची, जगदीश काटेंगे, नथुलाल ऊइके, तुळशीराम बावनथळे, रेखा शहारे, हिना कोरेटी यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
मनरेगा बचावासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #korchi













