वसुंधरा वाचवण्यासाठी प्लास्टिकला फाटा द्या : प्राचार्य नंदुजी गोबाडे
– कोरची येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
The गडविश्व
ता. प्र/कोरची, दि.०२ : प्लास्टिकमुळे वसुंधरेसमोर आज सर्वात मोठे पर्यावरणीय संकट उभे ठाकले आहे. प्लास्टिक नष्ट होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने हातभार लावावा, असे आवाहन प्राचार्य नंदुजी गोबाडे यांनी केले.
तालुक्याच्या मुख्यालयापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, बेडगाव येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेडगावचे सरपंच चेतन किरसान होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भगवंतराव विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव नागपुरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी अमित दास, बेडगाव शाळेचे मुख्याध्यापक चुडूराम धारणे, तसेच दामोधर बोगा, हरिश्चंद्र मडावी, देवराव मेश्राम, मनोहर मुंगमोडे, सुनील कुळसुंगे, देविदास गुरनुले, रिनाताई गोटा, कविता गुरवेली, मंदा गोटा, केंद्रप्रमुख संजय बिडवाईकर, गुणवंत हेडाऊ, मंदा आवारी, ओमराव टेंभूर्णे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना नामदेव नागपुरे यांनी विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी कशी निर्माण करता येईल, यावर सखोल विचार मांडला. कमी गुण मिळाले तरी कल्पनाशक्ती, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कोणीही यशस्वी होऊ शकतो. ज्ञान आणि गरिबी यांचा संबंध जोडण्यात अर्थ नाही; स्वतःतील सर्जनशीलतेचा विकास करावा, असे ते म्हणाले.
विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध वैज्ञानिक प्रतिकृतींचे अवलोकन केले. या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण ६८ प्रतिकृती सादर करण्यात आल्या होत्या. प्राचार्य नंदुजी गोबाडे यांनी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी अमित दास, सूत्रसंचालन सुरज हेमके, तर आभार प्राचार्य चुडूराम धारणे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, तालुक्यातील विज्ञान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.













