प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कोरची येथे तालुकास्तरीय कार्यशाळा

120

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कोरची येथे तालुकास्तरीय कार्यशाळा
The गडविश्व
ता. प्र / कोरची, दि. ३१ : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME Scheme) याविषयी शेतकरी, उद्योजक व महिला बचत गटांना सविस्तर मार्गदर्शन मिळावे, यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोरची यांच्या वतीने सोमवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात सकाळी १० वाजता तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेचे संचालन सहाय्यक कृषी अधिकारी अमोल डोंगरवार यांनी केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी प्रस्ताविक भाषणात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण व आदिवासी भागातील शेतकऱ्यांसाठी ही योजना कशी लाभदायी ठरू शकते, याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत प्रभारी मंडळ कृषी अधिकारी ज्ञानेश्वर मसराम यांनी योजनेची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. योजनेची उद्दिष्टे, पात्रता निकष, लाभाचे स्वरूप, अर्ज करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, अनुदानाची रक्कम तसेच बँक कर्ज सुविधांबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. आदिवासी बहुल भागातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उभारावेत व त्यातून त्यांच्या जीवनमानात सुधारणा व्हावी, हा या कार्यशाळेमागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकऱ्यांच्या शंका व प्रश्नांनाही त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी गुण नियंत्रण अधिकारी ईश्वरदयाल पाथोडे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेला तालुक्यातील शेतकरी, नवउद्योजक तसेच महिला बचत गटांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी नागेश मिसाळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here