ग्राहक संरक्षणासाठी डिजिटल यंत्रणेचा प्रभावी वापर आवश्यक : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
– राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, दि. २४ : बदलत्या डिजिटल युगात ग्राहक संरक्षण अधिक सक्षम करण्यासाठी डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. ऑनलाइन व्यवहार, डिजिटल पेमेंट व्यवस्था, ई-तक्रार नोंदणी व तंत्रज्ञानाधारित सेवा यामुळे व्यवहारात पारदर्शकता येते आणि ग्राहकांना जलद, सुलभ व सुरक्षित सेवा मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आज गोंडवाना कला केंद्र, गडचिरोली येथे आयोजित जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ग्राहक हक्क, तक्रार निवारण व्यवस्था तसेच डिजिटल साधनांच्या प्रभावी वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हाधिकारी पंडा यांनी ग्राहकांनी खरेदी करताना बिल घेणे, वस्तू व सेवांच्या दर्जाबाबत जागरूक राहणे आणि कोणतीही तक्रार असल्यास अधिकृत मंचावर नोंद करणे आवश्यक असल्याचे आवर्जून सांगितले. डिजिटल माध्यमांमुळे ग्राहक व व्यापारी यांच्यातील व्यवहार अधिक विश्वासार्ह होऊ शकतात, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात ग्राहक संरक्षण कायदा, वजन-मापे नियमांचे काटेकोर पालन, स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाची भूमिका यावर उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले. ग्राहक हक्कांविषयी जनजागृती वाढविणे ही काळाची गरज असून, शासनाच्या विविध डिजिटल उपक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास चंद्रशेखर भडांगे (अशासकीय सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण समिती), तहसीलदार सागर कांबळे, शिरीष कापडे (सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी), ॲड. माधुरी आटमांडे (सदस्य, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच), प्रवीण घाटे (अशासकीय सदस्य), प्रा. अरुण पा. मुन्घाटे, उदय धकाते, विजय मुसनवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक), आंबेकर (तालुका पुरवठा अधिकारी), देवानंद फुलझेले (वजन-मापे अधिकारी), दीपक चौधरी (स्वस्त धान्य दुकानदार संघटना), विजय शृंगारपवार, चंद्रकांत पतरंगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे ग्राहक हक्कांविषयी व्यापक जनजागृती होऊन ग्राहक संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.













