राष्ट्रध्वज अपमान प्रकरणी कारवाई रखडली : कुरखेडात युवक आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा

221

राष्ट्रध्वज अपमान प्रकरणी कारवाई रखडली : कुरखेडात युवक आक्रमक, तीव्र आंदोलनाचा इशारा
– निवेदन केले सादर
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २३ : नगर पंचायत कुरखेडा अंतर्गत कचरा गाडीत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रध्वज तिरंगा आढळल्याच्या गंभीर व धक्कादायक घटनेला तीन दिवस उलटूनही दोषींवर कोणतीही फौजदारी कारवाई न झाल्याने शहरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रध्वजाच्या अपमानास प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत सर्वपक्षीय युवकांनी आज आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तात्काळ गुन्हा दाखल करण्याची जोरदार मागणी केली आहे. येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात राष्ट्रप्रेमी नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एकीकडे ‘हर घर तिरंगा’सारख्या उपक्रमांद्वारे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचे संदेश दिले जात असताना, दुसरीकडे प्रशासकीय निष्काळजीपणामुळे राष्ट्रध्वजाचा असा अपमान होणे अत्यंत दुर्दैवी व लज्जास्पद असल्याचे युवकांनी नमूद केले. हा प्रकार साधी लापरवाही नसून थेट राष्ट्रध्वजाच्या सन्मानावर घाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आज सादर करण्यात आलेल्या निवेदनात हा प्रकार ‘राष्ट्रीय सन्मान अपमान प्रतिबंधक कायदा, १९७१’ अंतर्गत गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. या कायद्यानुसार दोषींना तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. असे असतानाही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने युवकांमध्ये संताप खदखदत आहे.
निवेदन सादर करताना अनिकेत आकरे, ईश्वर ठाकूर, शहजाद हाशमी, दीपक धारगाये, लोकेंद्र शहा सयाम, मृणाल माकडे, प्रांजल धाबेकर, नागेश फाये, प्रशांत हटतवार, नितेश निरंकारी, आशिष तुलावी, शुभम ठाकरे, आशिष हुमने, यश सोनकुसरे, आकाश उईके व सुशील बेहेर यांच्यासह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र युवकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, दोन दिवसांत कारवाई न झाल्यास कुरखेडा येथे रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा युवकांनी दिला आहे. दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत हा लढा सुरू राहील, असे वातावरण सध्या शहरात निर्माण झाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here