20 वर्षांपासून रखडलेल्या नाळेवाही पुलासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा

93

20 वर्षांपासून रखडलेल्या नाळेवाही पुलासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा
- रांगी–जांभळी मार्गावरील अर्धवट पुलामुळे जीवघेणा प्रवास
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २४ : धानोरा तालुक्यातील रांगी ते आरमोरी तालुक्यातील शेवटचे गाव जांभळी या मार्गावर वाहणाऱ्या नाळेवाही नाल्यावरील पुलाचे बांधकाम गेल्या तब्बल 20 वर्षांपासून रखडलेले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वारंवार निवेदने, पत्रव्यवहार व पाठपुरावा करूनही प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
रांगी–जांभळी हे अंतर कमी असले तरी या मार्गावरून दररोज प्रवासी, विद्यार्थी, कर्मचारी व शेतकऱ्यांना ये-जा करावी लागते. मात्र नाळेवाही नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात पाण्यातून, तर उर्वरित ऋतूंमध्ये जीव धोक्यात घालून नाला पार करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह प्रचंड वाढत असल्याने अनेक वेळा संपर्क पूर्णतः तुटतो. शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर शेतीजमिनी नाल्यापलीकडे असल्याने शेतीकामांसाठीही धोकादायक प्रवास करावा लागतो.
नाळेवाही नाल्यावर सुमारे 20 वर्षांपूर्वी शासनाने पूल मंजूर केला होता. तत्कालीन कंत्राटदाराने काम सुरूही केले. मात्र नक्षलवादी अडथळ्यांमुळे काम थांबले आणि त्याचदरम्यान संबंधित कंत्राटदाराची हत्या झाल्यानंतर पुलाचे काम अर्धवट अवस्थेतच राहिले. आजही काँक्रीटचे काही पिल्लर उभे असून त्यापैकी एक पिल्लर वाकलेले, तर पाण्याच्या प्रवाहामुळे दोन्ही बाजूंनी खोदकाम झाले आहे. त्यामुळे आता पूल लांब करावा लागणार असून खर्चातही मोठी वाढ होणार आहे.
दरम्यान, जांभळी गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आणि न्यायालयीन आदेशानंतर ग्रामपंचायतीची विभागणी झाली. मात्र गावाचा कणा असलेल्या पुलाच्या प्रश्नावर प्रशासन अजूनही मौन बाळगत असल्याने विकास खुंटला आहे. शिक्षण, आरोग्य, दैनंदिन व्यवहार व आपत्कालीन सेवा यांवरही याचा मोठा परिणाम होत आहे.
देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना 75 वर्षांनंतरही जांभळी गावासाठी पूल उभा राहू शकत नाही, ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात तरी पूल पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार झाला, मात्र पुलाचे बांधकाम अपूर्णच राहिले.
नाळेवाही पुलासाठी ग्रामसभेत ठराव घेऊन केंद्रीय गृहमंत्रालय अंतर्गत निधीची मागणी करण्यात आली होती. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या नागपूर येथील मुख्य अभियंत्यांनी गावाला भेट देऊन अर्धवट पुलाची पाहणी केली आणि चालू अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव तयार केला. मात्र तो प्रस्ताव कुठे अडकला, याची माहिती आजतागायत ग्रामस्थांना मिळालेली नाही.
20 वर्षांपासून ‘भिजत घोंगडे’ कायम असलेल्या या पुलाच्या प्रश्नावर आता तरी ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन व उपोषण छेडण्याचा इशारा जांभळी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे. आता तरी प्रशासन जागे होणार का, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #NalevahiBridge #JambhaliRangiRoad #BridgeConstructionDelay #HungerStrikeWarning #RuralInfrastructure #PublicSafety #PMGSY #Gadchiroli #DhanoraTaluka #DevelopmentDelayed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here