जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथे गणित दिन उत्साहात साजरा
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २३ : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, धानोरा येथे २२ डिसेंबर २०२५ रोजी थोर भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणित दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक प्रशांत साळवे यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांना रामानुजन यांच्या जीवनकार्यावर आधारित माहितीपट (चित्रफित) दाखविण्यात आला.
गणित दिनाचे औचित्य साधून शाळेत चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, गणित प्रश्न मंजुषा तसेच गणिती उखाणे स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड निर्माण होऊन त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळाली.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पी. बी. तोटावार, एस. एम. रत्नागिरी, विजय बुरमवार, एम. एल. देवकते, पी. टी. शेंडे, डॉ. रश्मी डोके, कु. रजनी मडावी, कांचन दशमुखे, आनंदवार मॅडम, कोरेवार मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गणित शिक्षक कोल्हटकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ओम देशमुख, भालेराव यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













