कुरखेडा : २५ लाखांचा अपहार उघड, प्रशासन मात्र गप्पच
– सोनसरी ग्रामस्थांचा १७ डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाचा एल्गार
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १५ : सोनसरी ग्रामपंचायतीतील सुमारे २५ लाख रुपयांच्या आर्थिक अपहारप्रकरणी दोन महिन्यांहून अधिक काळ लोटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात ग्रामस्थांनी १७ डिसेंबरपासून पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
या प्रकरणात माजी ग्रामसेविका श्रीमती एन. एन. कुमरे यांच्यावर गंभीर आरोप असून, ग्रामस्थांनी ८ ऑक्टोबर रोजी १०३ सह्यांचे निवेदन गट विकास अधिकारी धीरज पाटील यांना सादर केले होते. चौकशी व कारवाईचे आश्वासन देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात कोणतीही हालचाल न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, आज प्रशासनाला देण्यात आलेल्या पूर्वसूचना पत्रात ग्रामस्थांनी आपल्या मागण्या स्पष्ट शब्दांत मांडल्या आहेत. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, अपहाराच्या प्रकरणात केवळ चौकशी नव्हे तर तात्काळ कठोर कारवाई आवश्यक आहे. त्याअनुषंगाने अपहारास जबाबदार माजी ग्रामसेविकेवर तात्काळ निलंबनाची कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच, ग्रामपंचायतीच्या सर्व आर्थिक व्यवहारांची १५ दिवसांच्या आत विशेष ऑडिट करून त्याचा सविस्तर अहवाल ग्रामसभेपुढे मांडण्यात यावा. याशिवाय, अपहार झालेली संपूर्ण रक्कम दोषींंकडून वसूल करून ग्रामपंचायत खात्यात परत जमा करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाला १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंतिम मुदत दिली असून, तोपर्यंत मागण्या लेखी स्वरूपात मान्य न झाल्यास १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या आंदोलनाला महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून, उपोषण शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यालाही पूर्वकल्पना देण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे तालुक्यातील इतर गावांमध्येही ग्रामपंचायतीतील आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सोनसरी ग्रामस्थांच्या उपोषणाची जिल्हा प्रशासन गांभीर्याने दखल घेते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice













