चामोर्शी : अपंगत्वावर मात करून श्वेता कोवेची आंतरराष्ट्रीय झेप
The गडविश्व
चामोर्शी, दि. १५ : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर अपंगत्वावर मात करत आंतरराष्ट्रीय क्रीडांगणावर यशाची झेप घेणारी कढोली (ता. चामोर्शी) येथील श्वेता भास्कर कोवे आज संपूर्ण तालुका व जिल्ह्याचा अभिमान ठरली आहे. जन्मत: एका हाताने ६८ टक्के अस्थिव्यंग असतानाही तिने धनुर्विद्येत (आर्चरी) उल्लेखनीय कामगिरी करत चामोर्शीचा मान उंचावला आहे.
श्वेता हिचे बालपण संघर्षात गेले. दहावीत शिक्षण घेत असतानाच वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबाची सर्व जबाबदारी आईवर येऊन पडली. आर्थिक अडचणी, अपंगत्व आणि समाजातील नकारात्मक दृष्टीकोन यांचा सामना करत तिने शिक्षण सुरू ठेवले. प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा कढोली येथे इयत्ता १ ते ७ पर्यंत, तर पुढील शिक्षण महात्मा फुले विद्यालय, आष्टी येथे झाले.
लहानपणापासूनच निशाना साधण्याची आवड असल्याने शाळेत गनशुटिंगचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तिने आर्चरी या खेळाकडे आपले लक्ष केंद्रित केले. “हा खेळ मुलींचा नाही”, “तू अपंग आहेस” अशा अनेक निरुत्साही करणाऱ्या शब्दांनाही न जुमानता श्वेताने सराव सुरूच ठेवला. शाळा आणि स्थानिक नागरिकांच्या आर्थिक मदतीतून तिला खेळाचे साहित्य उपलब्ध झाले. बुलढाणा येथे दीड वर्षे कठोर प्रशिक्षण घेत असताना ती नेहमीच प्रथम क्रमांकावर राहिली.
या मेहनतीचे चीज तिला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळाले. श्वेताने दिल्ली येथे झालेल्या पॅरा इंटरनॅशनल ट्रायलमध्ये दुसरा क्रमांक, तर हरियानामध्येही दुसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर दुबई येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सातत्याने सराव करत अखेर तिने दुबईतील स्पर्धेत प्राविण्य मिळवत कढोली ते चामोर्शी आणि गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला.
दरम्यान, २०२४ मध्ये येनापूर परिसरात स्थापन झालेल्या ‘दिव्यांग व्यक्तीची शक्ती’ दिव्यांग संघटनेची श्वेता सक्रिय सदस्य आहे. “दिव्यांग असलो तरी जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही,” असा सकारात्मक संदेश देत ती इतर दिव्यांगांना प्रेरणा देत आहे.
या घवघवीत यशाबद्दल श्वेता कोवे तसेच तिचे मार्गदर्शक मा. शाम कोरर्डे यांचे विदर्भ दिव्यांग संघटना, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्था (गडचिरोली) तसेच चंद्रपूर, भंडारा व गोंदिया येथील विविध दिव्यांग संघटनांकडून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
संघर्षातून यशाकडे झेप घेणारी श्वेता कोवे आज असंख्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #ShwetaKowe #InternationalAchievement #ParaArcher #ArcheryChampion #DisabilityToAbility #InspirationStory #WomenInSports #ChamorashiPride #GadchiroliPride #DivyangPower #NeverGiveUp #PrideOfMaharashtra













