– तत्काळ पंचनामे करण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : तालुक्यात २३ व २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकताच परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा निसर्ग कोसळला असून शेतकरी अक्षरशः हवालदिल झाले आहेत.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे कापणी करून ठेवलेले धान पावसात भिजले असून, काही ठिकाणी धानाचे कळपे पूर्णतः ओले झाले आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांचे उभे पीक आधीच परतीच्या पावसाने आडवे झाले होते, तर अनेक पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव झाल्याने हानी दुप्पट झाली आहे.
गेल्या चार महिन्यांपासून दिवसरात्र शेतीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातातील सर्व मेहनत पाण्यात गेल्याने ते उद्विग्न झाले आहेत. “आता उदरनिर्वाह करायचा तरी कसा?” असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटला आहे.
या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांची “हातावर पोट” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करून योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanoranews














