बोटानफुंडी ग्रामसभेचा सुरजागड खाण प्रकल्पाविरुद्ध एकमुखी ठराव

163

The गडविश्व
ता. प्र / भामरागड, दि. १८ : भामरागड तालुक्यातील बोटानफुंडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभा उत्साहात पार पडली. या ग्रामसभेत ग्रामविकास, पेसा कायदा अंमलबजावणी, वनहक्क कायदा संवर्धन तसेच गावातील विकास योजनांवर चर्चा झाली. मात्र ग्रामसभेत सर्वाधिक गाजलेला मुद्दा ठरला तो म्हणजे सुरजगड लॉयड्स मेटल कंपनीकडून बोटानफुंडी, विसामुंडी आणि गुंडापुरी हद्दीत सुरू असलेले पाईपलाईन टाकण्याचे काम. ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत सांगितले की ही कामे कोणत्याही ग्रामसभेच्या परवानगीशिवाय आणि ठरावाविना सुरू करण्यात आली आहेत.
ग्रामस्थांच्या मते दुडेपल्ली–बोटानफुंडी हा महत्त्वाचा रस्ता पाईपलाईन टाकताना उखडून टाकण्यात आला असून त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत एकमुखाने ठराव मंजूर करण्यात आला. त्यानुसार पाईपलाईनचे काम तातडीने थांबविण्यात यावे, ग्रामसभेची औपचारिक परवानगी व ठराव होईपर्यंत कोणतेही नवीन काम सुरू करू नये, दुडेपल्ली–बोटानफुंडी रस्ता पूर्ववत करून दर्जेदार रस्ता तयार करावा, कंपनीला नोटीस बजावावी तसेच तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कामबंदी लागू करावी अशी मागणी करण्यात आली.
ग्रामसभेने अधोरेखित केले की कंपनीची ही कारवाई पेसा कायदा १९९६ मधील कलम ४ (i) आणि वनहक्क कायदा २००६ मधील कलम ३(१)(i) व कलम ५ चे उल्लंघन आहे. या कायद्यांनुसार अनुसूचित क्षेत्रातील ग्रामसभेलाच गावातील विकासकामे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवरील नियंत्रणाचा अधिकार आहे.
या ग्रामसभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, वनरक्षक आणि अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी ठरावाला पाठिंबा दर्शवून ग्रामसभेची लोकशाही ताकद अधोरेखित केली. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी ठाम इशारा देत सांगितले की, “ग्रामसभेच्या परवानगीशिवाय गावात एक इंचही काम होणार नाही. आम्ही पेसा आणि वनहक्क कायद्याचा आधार घेऊन आमच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढू.”
बोटानफुंडी ग्रामसभेच्या या निर्णयामुळे परिसरातील इतर गावांसाठीही मार्गदर्शक ठराव झाला असून ग्रामसभेच्या संमतीशिवाय कोणतेही विकासकाम होऊ नये, असा ठोस संदेश या ठरावातून देण्यात आला आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #bhamragadnews #latestnews #ipl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here