चतुर्थ श्रेणी दर्जासाठी महसूल सेवकांचे नागपूर येथे ऐतिहासिक आंदोलन

147

चतुर्थ श्रेणी दर्जासाठी महसूल सेवकांचे नागपूर येथे ऐतिहासिक आंदोलन
The गडविश्व
नागपूर, दि. १६ : राज्यातील महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा या एकमेव मागणीसाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या नेतृत्वाखाली संविधान चौक, नागपूर येथे १३ सप्टेंबरपासून राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. ऊन, वारा, पाऊस वा विजांचा कडकडाट कोणत्याही परिस्थितीची पर्वा न करता सात ते आठ हजार महसूल सेवक या आंदोलनात ठामपणे सहभागी झाले आहेत.
यापूर्वी १० सप्टेंबर रोजी विदर्भातील सर्व महसूल सेवकांनी काळ्या फिती लावून आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली होती. ११ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे करण्यात आले. तर १२ सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास १३ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करू, असा इशारा महसूल मंत्री व विभागीय आयुक्त यांना दिला होता. अखेर शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने संघटनेने बेमुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
ब्रिटिश काळापासून कोतवाल म्हणून कार्यरत असलेल्या महसूल सेवकांनी आजवर निवडणुका, आपत्ती व्यवस्थापन, जनगणना, शेतशिवार पंचनामे, BLO, गौण खनिज तपासणी, कार्यालयीन शिपाईगिरी, शासकीय उत्सवांची तयारी, ग्रामपातळीवरील शिबिरे, शासकीय आदेश तामील करणे यासह असंख्य जबाबदाऱ्या इमानेइतबारे पार पाडल्या आहेत. तरीदेखील शासनाकडून चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळत नसल्याबद्दल सेवकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
“आमची मागणी मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही,” असा ठाम इशारा विदर्भ महसूल सेवक संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोंदेले, कार्याध्यक्ष मंगेश जांभूळकर, राज्य उपाध्यक्ष गोपाल ठवरे व योगेश शेडमाके, राज्य संघटक घनश्याम पटले, सरचिटणीस दीपक रेवतकर, उपाध्यक्ष रोशन जोगवे, सचिव स्वराज जिलटे तसेच सर्व जिल्हा अध्यक्षांनी दिला आहे.
महसूल सेवकांचे हे आंदोलन राज्यातील प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची शक्यता असून शासन यावर कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #NagpurProtest #RevenueServants #ClassIVDemand #HistoricAgitation #VidarbhaMovement #MaharashtraProtest #GovernmentEmployees #NagpurNews #WorkersRights #StatewideAgitation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here