भामरागडमध्ये वीजेचा खेळखंडोबा ; भ्रष्टाचाराच्या सावटाखाली नागरिक त्रस्त

143

भामरागडमध्ये वीजेचा खेळखंडोबा ; भ्रष्टाचाराच्या सावटाखाली नागरिक त्रस्त
The गडविश्व
ता.प्र / भामरागड, दि.१२ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुका मागील दीड वर्षांपासून वीजेच्या गंभीर समस्येला तोंड देत आहे. दिवसातून ८ ते १० वेळा वीजपुरवठा खंडित होणे ही येथे नागरिकांसाठी रोजची बाब झाली आहे. व्यापारी, शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक वीजेच्या या खेळखंडोब्यामुळे अक्षरशः हैराण झाले आहेत.

भ्रष्टाचारामुळे वाढले अडथळे

स्थानिकांनी दिलेल्या तक्रारींनंतरही परिस्थितीत सुधारणा होत नाही. मेंटेनन्ससाठी मिळणारा निधी अधिकाऱ्यांच्या खिशात जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे लाईनमध्ये वारंवार फॉल्ट निर्माण होऊन दुरुस्ती वेळेवर होत नाही. व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प, शीतपेयं व खाद्यपदार्थ खराब होणे, ग्राहक दुरावणे अशी स्थिती निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात

विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर सर्वाधिक परिणाम झाला आहे. मोबाईल नेटवर्क आधीच कमी असलेल्या भागात ऑनलाईन शिक्षण घेणे अशक्य झाले आहे. संगणक- मोबाईल चार्ज न होणे, रात्री अभ्यासात अंधाराची अडचण यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याची खंत व्यक्त होत आहे.

प्रशासनाची डोळेझाक

महावितरणचे अधिकारी मेंटेनन्सच्या नावाखाली भ्रष्टाचार करत असल्याचे आरोप नागरिक सर्रास करत आहेत. वारंवार तक्रारी करूनही एस.सी. कार्यालय व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे प्रशासन भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय बळावला आहे.

आंदोलनाचा इशारा

नागरिक, व्यापारी संघटना, शेतकरी व विद्यार्थी आता संतप्त झाले असून लवकरच तीव्र आंदोलन उभारण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. वीजबिल फाडून निषेध, ठिय्या आंदोलन व मोर्चे काढण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

शासनाकडे मागणी

भामरागड हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहुल तालुका असल्याने आधीच विकासाची गती मंदावलेली आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्याचा बोजवारा हा नागरिकांवरील अन्याय असल्याची भावना वाढत आहे. शासनाने तातडीने हस्तक्षेप करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि तालुक्याला सुरळीत वीजपुरवठा द्यावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #latestnews #latestnews #bhamragad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here