गडचिरोली पोलीस दलाचा “प्रोजेक्ट उडान” उपक्रम : ३७५० विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा सराव पेपरात उत्स्फूर्त सहभाग

237

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : दुर्गम-अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या “प्रोजेक्ट उडान” या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अंतर्गत १ सप्टेंबर ला गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृह तसेच जिल्ह्यातील ७१ वाचनालयांमध्ये मोफत स्पर्धा परीक्षा सराव पेपर क्र. ८ चे आयोजन करण्यात आले.
या सराव परीक्षेत जिल्हाभरातून तब्बल ३७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या ८ टेस्ट सिरीजमधून एकूण २७,९५० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. गडचिरोलीसह भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा अशा दुर्गम भागांतही विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. नव्याने स्थापन झालेल्या पोलीस मदत केंद्र, पेनगुंडा (२५ विद्यार्थी), नेलगुंडा (१० विद्यार्थी) व कवंडे (२ विद्यार्थी) येथूनही उमेदवारांनी परीक्षेत भाग घेतला.
या सराव पेपरचा लाभ येणाऱ्या पोलीस शिपाई, वनरक्षक, तलाठी भरती तसेच विविध संयुक्त स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. गडचिरोली पोलीस मुख्यालय परिसरातील परीक्षेत एकट्या १७५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
यावेळी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांचे मनोबल वाढविले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/उपपोस्टे/पोमकेंचे प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व सर्व पोलीस अंमलदार यांनी परिश्रम घेतले.
गडचिरोली पोलीस दलाचा हा अभिनव उपक्रम दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे दार उघडणारा ठरत असून “प्रोजेक्ट उडान” मुळे हजारो युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here