The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि. ०१ : विकास विद्यालय तथा थोरवी कनिष्ठ महाविद्यालयात पाच दिवसीय गणेशोत्सवाचा जल्लोष भक्तिभावाने आणि उत्साहात संपन्न झाला. २७ ऑगस्टपासून सुरू झालेल्या या उत्सवाची सांगता ३१ ऑगस्ट रोजी काला कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणुकीने झाली.
भजन मंडळींच्या सुमधुर गायनाने वातावरण भक्तिमय झाले, तर टाळ–मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी आणि उपस्थित भक्तांनी बाप्पाचा जयघोष करीत आनंद लुटला. विसर्जन मिरवणुकीत विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष पुंडलिकराव आकरे, सचिव सौ. नंदा आकरे, प्राचार्य अनिकेत आकरे, मुख्याध्यापक आर.एम. अलगदेवे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून विसर्जनाची तयारी केली.
यंदा विद्यालयाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर विशेष भर दिला. शाडू मातीच्या मूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे या उत्सवातून विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक मूल्ये, सांस्कृतिक वारसा आणि सामूहिक कार्याचा संदेश दृढ होत असल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolinews #gadchirolipolice #kurkhedanews













