– शिवसेना (शिंदे गट)चा प्रशासनावर हल्लाबोल
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २९ : कुरखेडा नगर पंचायतकडून पुरवला जाणारा दूषित पाणीपुरवठा हा येथील नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका ठरत असताना, शिवसेना (शिंदे गट)ने प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमदार रामदास मसराम यांच्या २८ ऑगस्ट च्या जनता दरबारात संघटनमंत्री ईश्वर ठाकूर व तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे यांनी दूषित पाण्याने भरलेली बाटली ठेवत नगर पंचायतच्या अभियंता जनबंधू यांना थेट “हे पाणी पिऊन दाखवा” असे आव्हान दिले.
शिवसेनेचे तालुका वैद्यकीय प्रमुख शहेजाद हाशमी यांनी सांगितले की, दूषित पाण्यामुळे अनेक कुटुंबे आजारपणाला सामोरे जात आहेत. “जेव्हा शुद्ध पाणी देण्यास नगर पंचायत अपयशी ठरते, तेव्हा नागरिकांकडून पाणीपट्टी आकारण्याचा अधिकार त्यांना कसा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्ट केले की, शुद्ध पाण्याची व्यवस्था होईपर्यंत पाणीपट्टी आकारली जाऊ नये.
या प्रसंगी आमदार मसराम यांनीही प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त करून तातडीने शुद्ध पाणीपुरवठ्याचे निर्देश दिले. मात्र अभियंता जनबंधू यांनी जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू होईपर्यंत समस्या सुटणे अशक्य असल्याचे सांगत प्रशासनिक पाठपुरावा सुरू असल्याचा दावा केला.
यावर ईश्वर ठाकूर यांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत, “लोकांच्या आरोग्याशी खेळ होत असताना, प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे का?” असा थेट सवाल केला.
दरम्यान, नगर पंचायतवर गेल्या दोन टर्मपासून सत्ता असलेले चंदेल यांचा पक्ष या प्रकरणामुळे अडचणीत सापडला आहे. याआधी ३ कोटींपैकी १ कोटी खर्चून केवळ ‘खंडहर’ उभारल्याच्या टीका त्यांच्या कारभारावर झाल्या होत्या. आता त्यांच्या पक्षातीलच नेत्यांनी शुद्ध पाणीप्रश्नावर आवाज उठवल्याने स्थानिक राजकारणात तापलेले वातावरण अधिक चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
या घडामोडीमुळे संतप्त नागरिक शुद्ध पाण्यासाठी ठोस निर्णयाच्या प्रतीक्षेत असून, येत्या काही दिवसांत या प्रश्नावरून राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolinews













