– सर्व्हर डाऊनमुळे नोंदणी ठप्प, शेतकऱ्यांच्या मनात वंचित राहण्याची भीती
The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २९ : धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी तसेच बोनस मिळवण्यासाठी ई-पिक नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र नोंदणी सुरु होताच वारंवार सर्व्हर डाऊन व नेटवर्कच्या समस्येमुळे नोंदणीची प्रक्रिया रखडली असून शेतकरी अक्षरशः हैराण झाले आहेत.
खुल्या बाजारपेठेत शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी शासकीय आधारभूत किंमत (एमएसपी) योजनेवर पूर्णपणे अवलंबून आहेत. मात्र उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य दर न मिळाल्याने शेतकरी आधीच कर्जबाजारी झाले आहेत. अशा परिस्थितीत ई-पिक नोंदणी ही शेतकऱ्यांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे.
शासनाने नोंदणीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली असून त्यानंतर महसूल विभागाच्या सहकार्याने १५ ऑक्टोबरपर्यंत पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरीसुद्धा नोंदणीसाठी वारंवार चकरा मारूनही काम न होत असल्याने शेतकऱ्यांच्या मनात योजनांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सवाल आहे की, “शासकीय लाभापासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचा हा डाव तर नाही ना?” शेतकऱ्यांनी शासनाकडे सर्व्हर व नेटवर्क समस्या तातडीने निकाली काढण्याची मागणी केली आहे.
ई-पिक नोंदणीचे तातडीने समाधान न झाल्यास अनेक शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolipolice #













