‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५’ जाहीर ; मंडळांनी सहभाग नोंदवावा

289

– जिल्हा प्रशासनाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य सरकारकडून गौरविण्यासाठी ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा – २०२५’ जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेत अधिकाधिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या स्पर्धेची निवड प्रक्रिया व निकष पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या २० ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहेत.

सहभाग पात्रता :

धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेले किंवा स्थानिक पोलीस/स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी घेतलेले सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात.

निवडीचे निकष :

स्पर्धेत मंडळांचे मूल्यमापन विविध निकषांवर होणार असून प्रत्येक निकषाला २० गुण देण्यात आले आहेत. त्यामध्ये –

कलांचे जतन व संवर्धन (गायन, नाट्य, नृत्य, लोककला, चित्रकला इ.)
साहित्य व संस्कृती संवर्धन (कवी संमेलन, पुस्तक मेळे, पारंपारिक खेळ, ग्रंथालये)
निसर्ग व सार्वजनिक संपत्ती संवर्धन (स्वच्छता, पर्यटन, गडकिल्ले, स्मारकांचे जतन)
सामाजिक कार्य (महिला, ज्येष्ठ, दिव्यांग, शासनाच्या योजना, प्रबोधन)
गणेशोत्सव आयोजनातील विधायकता (पर्यावरणपूरक मूर्ती, प्रदूषण टाळणे, सुविधा उपलब्ध करून देणे, कार्यकारिणीत किमान ३०% महिला सहभाग)

मार्गदर्शक तत्त्वे :

स्पर्धेचे समन्वयक पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीचे संचालक असतील.
मागील दोन वर्षांत राज्य किंवा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळवलेल्या मंडळांना या वर्षी संधी मिळणार नाही.
स्पर्धेत मागील वर्षाच्या अनंत चतुर्दशीपासून ते चालू वर्षाच्या अनंत चतुर्दशीपर्यंतच्या कार्याचा विचार केला जाईल.
विजेत्या मंडळाला त्यांच्या स्तरानुसार सर्वोच्च पुरस्कारच देण्यात येईल.
समितीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.

अर्ज प्रक्रिया :

इच्छुक मंडळांनी आपले अर्ज २२ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ऑनलाइन सादर करावेत. अर्ज mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहेत. अधिक माहितीसाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचा शासन निर्णय (ता. २० ऑगस्ट २०२५) पाहावा, असे जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यांनी कळविले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Ganeshotsav2025 #MaharashtraGovt #PublicGaneshMandals #GaneshMandalsCompetition #CulturalEvents #GadchiroliNews #MaharashtraCulture #GaneshFestival

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here