१००% अनुदानावर फळबाग, बांबू व पुष्पोत्पादनासाठी संधी

251

– गडचिरोलीतील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. २५ : गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी. फळबाग लागवड, बांबू रोपटी व पुष्पोत्पादनासाठी आता १०० टक्के अनुदानाने शेती समृद्ध करण्याची मोठी संधी कृषी विभागाने उपलब्ध करून दिली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (MGNREGS) अंतर्गत जॉब कार्डधारक शेतकऱ्यांनी आपल्या शेताच्या बांधावर, पडीक किंवा शेतीयोग्य जमिनीत ही लागवड करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.

शंभर टक्के अनुदान, तीन वर्षांची संपूर्ण देखभाल

योजनेअंतर्गत रोपे खरेदी, खड्डे खोदणे, लागवड, खत व्यवस्थापन व तीन वर्षांपर्यंत झाडांची निगा राखण्याची सर्व जबाबदारी शासनाकडून घेतली जाते. शेतकऱ्यांना कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता दर्जेदार कलमे व लागवडीसाठी आवश्यक सर्व सुविधा दिल्या जातात.

कोण पात्र?

अनुसूचित जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जमाती, गरीब व महिला कुटुंबप्रमुख, दिव्यांग लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, वनहक्क कायद्यातील पात्र शेतकरी, तसेच सीमांत व लहान शेतकरी या योजनेंतर्गत पात्र आहेत.

गडचिरोलीतील कलमांची उपलब्धता व शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद

गडचिरोलीत आंबा, काजू, चिकू, फणस यांसारख्या फळपिकांना मोठी मागणी असून, ‘हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र’ उपक्रमाअंतर्गत कृषी विभागामार्फत दर्जेदार कलमे शासकीय रोपवाटिकांमध्ये वाजवी दरात उपलब्ध आहेत. सोनापूर, वाकडी (गडचिरोली), कृष्णनगर (चामोर्शी), कसनसुर (एटापल्ली), व रामगड (कुरखेडा) येथील फळरोपवाटिकांमध्ये ही कलमे सहज मिळू शकतात.

अर्ज प्रक्रिया सुलभ आणि विनामूल्य

शेतकऱ्यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालय, ग्राम रोजगार सेवक अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून अर्ज सादर करावा. अर्ज विनामूल्य असून, प्रक्रिया पारदर्शक व सुलभ आहे.
कृषी विभागाने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा आणि आपल्या शेतीत फळबाग, बांबू, फूलशेतीच्या माध्यमातून उत्पन्न वाढवून समृद्धीकडे वाटचाल करावी, असे आवाहन केले आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #Gadchiroli #FruitOrchardScheme #100PercentSubsidy #AgricultureDevelopment #KrishiVibhag #MGNREGS #GreenMaharashtra #FarmerWelfare #OrchardFarming #BambooPlantation #Floriculture #ProsperousFarming #RuralDevelopment #VillageProgress
#गडचिरोली #फळबागयोजना #१००टक्केअनुदान #शेतीविकास #कृषीविभाग #MGNREGS #हरितमहाराष्ट्र #शेतकरीकल्याण #फळबागलागवड #बांबूलागवड #पुष्पोत्पादन #समृद्धशेती #ग्रामविकास #गावउन्नती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here