The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) तालुका धानोरा यांच्या वतीने १६ जून २०२५ रोजी विश्रामगृह, धानोरा येथे आढावा बैठक व सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे माजी राज्यमंत्री व अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांनी भूषवले.
बैठकीदरम्यान पक्ष संघटनात्मक बांधणीसह धानोरा तालुक्यातील विविध स्थानिक समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. विशेषतः धानोरा शहरातील नवा प्लॉट परिसरातील भीषण पाणीटंचाईबाबत तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार आत्राम यांनी मुख्याधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. तसेच ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारीअभावी व अपूर्ण आरोग्यसेवेच्या प्रश्नावर डॉ. गजबे यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला.
या बैठकीत आमदार राजे धर्मराव बाबा आत्राम यांचा शाल व श्रीफळ देऊन तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सर्फराज शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास माजी आमदार रामकृष्ण मडावी, रविभाऊ वासेकर, लिलाधर भरडकर, अभय इंदुरकर, मंगेश नर्चुलवर, शिवा वट्टी, दिलीप नागपुरे, आशाताई मंगम, निरुताई इंदुरकर, गणेश तुमराम, इंदिरा वाढई, पौर्णिमा मने, छाया उईके यांच्यासह पक्षाचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नियोजनबद्ध तयारी केली होती. बैठकीच्या माध्यमातून स्थानिक प्रश्नांवर थेट आमदारांच्या उपस्थितीत चर्चा होऊन तात्काळ कृतीसुरू करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
