ऑनलाइन अर्जाने खुले झाले विकासाचे दरवाजे; आदिवासी योजनांसाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करा

101

The गडविश्व
गडचिरोली, दि. ०३ : जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या नागरिकांसाठी आर्थिक स्वावलंबनाचे नवीन पर्व सुरू होत असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी विविध उत्पन्नवाढीच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनांतर्गत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पातून थेट ८५ ते १०० टक्क्यांपर्यंत अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनांचा लाभ बेरोजगार आदिवासी युवक-युवती, शेतकरी, दिव्यांग, महिला बचत गट, तसेच वनहक्क पट्टाधारक यांसाठी उपलब्ध असून, ताडपत्री, स्प्रे पंप, थ्रेशर मशीन, फळबाग लागवडीसाठी साहित्य, मोहफुल-निंबोळ्या गोळा करण्यासाठी जाळी, मत्स्यसंवर्धन साहित्य खरेदी, शेत सपाटीकरण अशा विविध बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
अर्जासाठी अनुसूचित जमातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, बँक खाते तपशील, ग्रामसभा ठराव यांसह आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अनिवार्य असून, विधवा, परित्यक्त्या व अपंग लाभार्थ्यांना स्वतंत्र प्रमाणपत्रे जोडावी लागणार आहेत.
सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी www.nbtribal.in या अधिकृत पोर्टलवर दिनांक १५ जुलै २०२५ पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावेत. अधिक माहितीसाठी संबंधित प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकाऱ्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here