The गडविश्व
गडचिरोली, दि. २९ : “सत्यनिष्ठेच्या संस्कृतीच्या माध्यमातुन राष्ट्रसमृध्दी” हे ब्रिदवाक्य घेउन यंदाच्या दक्षता जनजागृती सप्ताहास २८ नोव्हेंबर २०२४ पासुन आयोजन करण्यात आले आहे. सदर सप्ताहाच्या अनुषंगाने, आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलन शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आजपासून सुरु झालेला दक्षता जनजागृती सप्ताह ०३ नोव्हेंबर पर्यंत चालणार असून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली या कार्यालयाचे वतीने “भ्रष्टाचार निर्मुलनाचा विचार करे, लोकशाहीचा साकार” ही संकल्पना घेवून विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन करुन सर्वसामान्य नागरीकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. शासकीय लोकसेवक व त्यांच्या कुटूंबियांकरीता भ्रष्टाचार निर्मुलना संदर्भात चर्चासत्रे, व्याख्यान, कार्यशाळा तसेच विविध स्पर्धात्मक कार्यक्रम उदा. पथनाटयाचे आयोजन केले जाणार आहे. तसेच शहरी व तालुका क्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे घोषवाक्ये असलेले पत्रके, भिंती पत्रके, बॅनर व पोस्टर वितरीत करुन भ्रष्टाचार विरोधात जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जनजागृती सप्ताहाच्या निमीत्याने ग्रामसभेचे आयोजन करुन वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांचे भ्रष्टाचार जनजागृती संबंधी व्याख्यान ठेवण्यात आले आहे.
सप्ताह दरम्यान सर्व शासकीय कार्यालयात काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परीषद, नगर परीषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आणि शासकीय मानधन घेणा-या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी व इतर लोकसेवकांच्या भ्रष्टाचारासंबंधी आणि त्यांनी अवैध मार्गाने जमविलेल्या मालमत्तेबाबत काही माहिती असल्यास तसेच एखादया कामाकरीता एखादी व्यक्ती गैरमार्गाने पैशाची मागणी करीत असल्यास नागरीकांना टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क करावे. तसेच कार्यालय पोलीस उपअधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथील दूरध्वनी क्रमांक ०७१३२/ २९५०२० वर कळवावे किंवा प्रत्यक्ष कार्यालयात येवून तक्रार करावी, असे आवाहन पोलीस उप अधिक्षक चंद्रशेखर पी. ढोले, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांनी केले आहे.
दक्षता जनजागृती सप्ताहाच्या प्रारंभी आज स्थानिक इंदिरा गांधी चौक, टी-पाईंट गडचिरोली व ग्रामपंचायत कार्यालय कोटगल, नवेगाव ता. जि. गडचिरोली या ठिकाणी भ्रष्टाचार विरोधी बॅनर लावून जनजागृती करण्यात आली. तसेच स्थानिक सर्व कार्यालयात पोस्टर विटकवून व नागरीकांना पत्रके वितरीत करुन जनजागृती करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली कार्यालयात आज घेण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमास पोलीस उप अधिक्षक चंद्रशेखर ढोले, पोलीस निरीक्षक-संतोष पाटील, पोलीस निरीक्षक-शिवाजी राठोड, सफौ-सुनील पेद्दीवार, पोहवा/शंकर डांगे, पोहवा/राजु पदमगिरीवार, पोना/स्वप्निल बांबोळे, पोशि/संदीप उडान, पोशि/संदीप घोरमोडे, पोशि/प्रविण जुमनाके, मपोशि/विद्या म्हशाखेत्री, मपोशि/ज्योत्सना वसाके, चापोहवा /राजेश्वर कुमरे इत्यादी उपस्थित होते.













