मुनघाटे महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थिनींची लायर्ड मेटल्स अँड एनर्जीमध्ये निवड

86

मुनघाटे महाविद्यालयाच्या ११ विद्यार्थिनींची लायर्ड मेटल्स अँड एनर्जीमध्ये निवड
– रोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुन्हा यश
The गडविश्व
कुरखेडा, दि. ०९ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली संचलित श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्राने आणखी एक यश संपादन केले आहे. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील ११ विद्यार्थिनींची लायर्ड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या गडचिरोली येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रासाठी निवड झाली आहे.
लायर्ड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडतर्फे गडचिरोली जिल्ह्यातील १८ ते ३५ वयोगटातील पदवीधर युवक-युवतींसाठी रोजगार व कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या उद्देशाने आयोजित भरती प्रक्रियेत महाविद्यालयातील ज्योती राऊत, सुप्रिया सहारे, सलोनी दोणाडकर, ऐश्वर्या हलामी, प्रणाली गहाणे, सानिका हलामी, निशा पूडो, पूजा नैताम, साधना वटी, श्रुती सहारे आणि रोहिणी पाटणकर या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. मुलाखतीनंतर सर्व ११ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थिनींना गडचिरोली येथे दोन महिन्यांचे कौशल्यविकास प्रशिक्षण दिले जाणार असून, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या गुणवत्ता व कौशल्याच्या आधारे रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महाविद्यालयाच्या रोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे ही यशस्वी निवड प्रक्रिया पार पडली. महाविद्यालयाचे रोजगार मार्गदर्शन केंद्र विद्यार्थ्यांना हमखास रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे उपक्रमशील केंद्र म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही या केंद्रामार्फत राज्यातील तसेच देशातील विविध नामांकित कंपन्यांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला आहे.
या यशाबद्दल प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, उपप्राचार्य पी. एस. खोपे, उपप्राचार्य डॉ. अभय साळुंखे तसेच रोजगार मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख डॉ. गुणवंत वडपल्लीवार यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here