राज्यात ८ ते १२ मार्च दरम्यान महिला दिन सप्ताह, शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणार : शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

173

The गडविश्व
मुंबई : राज्यात ८ ते १२ मार्च २०२२ पर्यंत महिला दिन सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानिमित्त राज्य, जिल्हा आणि शाळास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली.
८ मार्च, १९०८ रोजी अमेरिकेतील महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ संपूर्ण जगभरात दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी ज्ञानाची कवाडे खुली करत लाखो स्त्रियांना नवे क्षितीज दाखवले आणि नवी पहाट उगवली. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये सर्वांचा सहभाग मिळावा व त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून राज्यात ‘जागतिक महिला दिन’ साजरा केला जातो. यावर्षी कोविड १९ च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सामाजिक अंतर राखणे व स्वच्छतेच्या आवश्यक त्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून हे उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
यावर्षी महिला दिन सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रम साजरे करण्यात येत आहेत. यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषादेमार्फत राज्यस्तरावर ऑनलाईन/ ऑफलाईन आयोजित करावयाच्या कार्यक्रमामध्ये 8 मार्च रोजी ‘जागर जाणिवांचा’ या उपक्रमात शालेय शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते मुलींच्या सक्षमीकरणास पोषक उपक्रमांचे उद्घाटन होईल. 9 मार्च रोजी महिला सक्षमीकरण व समाजाचा बदलता दृष्टीकोन उपक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या श्रीमती श्रुती तांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात येईल. 10 मार्च रोजी ‘घे भरारी’- करिअरच्या नवीन संधींबाबत मुरूड येथील प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर आर्थिक स्त्रोतांची माहिती देऊन मार्गदर्शन करतील. 11 मार्च रोजी महिलांविषयी कायदे आणि जाणीव जागृती बाबत ॲड. दिव्या चव्हाण मार्गदर्शन करतील. तर 12 मार्च रोजी ‘माझी सखी, माझी सहचारी’ उपक्रमांतर्गत सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रामध्ये योगदान दिलेले स्नेहग्राम संस्थेचे श्रीमती विनया निंबाळकर व महेश निंबाळकर यांची मुलाखत आयोजित करण्यात येईल.
याचप्रमाणे जिल्हा, तालुका आणि शाळास्तरावर वक्तृत्व स्पर्धा, अनुभव कथन, समुपदेशन, चर्चासत्र, महिला सक्षमीकरणावर आधारित चित्रपट/ चित्रफितीच्या साहाय्याने अभिव्यक्ती तसेच जिल्ह्यातील प्रेरणादायी महिलेचे व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहेत.
या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन #महिलादिन२०२२ #womensdaymh2022 या #hashtag चा उपयोग करून उपक्रमाशी संबंधित व्हीडिओ व साहित्य विविध समाजमाध्यमांवर (Facebook, Instragram, Twitter) अपलोड करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here