युजर्सने समाज घडवावा की बिघडवावा ?

236

सोशल मीडिया- समाज माध्यमे विशेष.

_एखाद्या सोशल नेटवर्क सेवेचा पाया म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर तयार केलेले प्रोफाईल पान अर्थात माहितीचे पान असते. एखाद्या व्यक्तीचा इंटरनेटवरील आविष्कार, रूप किंवा अवतार म्हणजे हे प्रोफाईल पान होय. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे ही व्यक्तीला अशा प्रकारची प्रोफाईल बनवणे, त्या संकेतस्थळांवरील इतर व्यक्तींशी ओळख व मैत्री करणे तसेच विविध माहितीची देवाण-घेवाण करणे आदींची संधी देतात. अशा या जीवलग सोशल मीडियाबद्दल रोचक माहिती श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार देत आहेत…

इंटरनेटवर उपलब्ध असणारा, विविध व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व ते जपू देणारा मंच म्हणजे सोशल नेटवर्क सेवा होय. सोशल नेटवर्क अथवा सामाजिक जाळे म्हणजे असे गट जेथे समान विचारांची, सारख्या आवडीनिवडींची माणसे एकत्र येतात. या संज्ञेत जरी प्रत्यक्ष भेट अथवा थेट संवाद अपेक्षित असला, तरी ही संज्ञा इंटरनेटवरील सेवेसही लागू पडते. ही सेवा मुख्यतः इंटरनेटवरील विविध संकेतस्थळांच्या मार्फत पुरवली जाते. अशा संकेतस्थळांना सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे असे म्हणतात. सोशल नेटवर्किंग व सोशल नेटवर्क या व्याख्या अनेकदा समानार्थी वापरल्या जातात. परंतु नेटवर्किंग या शब्दात अनोळखी व्यक्तींशी देखील नाते जोडणे अपेक्षित आहे; तर सोशल नेटवर्क या शब्दाचा अर्थ व्यापक असून त्यात खऱ्या आयुष्यातील ओळखीच्या लोकांशी देखील इंटरनेटवर नाते जोडणे अपेक्षित असते. सुमारे २०० वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर जेवढे लोक नव्हते, तेवढे आज एका फेसबुक नामक सोशल नेटवर्कवर आहेत. लोक भाषा, सीमा सर्व विसरून एकमेकांशी जोडण्याच्या भावनेने सोशल नेटवर्कचा भाग होतात. काही लोक हे जुन्या मित्र-मैत्रिणींच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल नेटवर्कवर येतात.
काही तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे, की सिक्सडिग्रीज.कॉम हे पहिले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ इ.स.१९९७ साली सुरू झाले. सर्वप्रथम येथे सदस्यांना प्रोफाईल- माहिती पान उघडण्याची व मित्रमंडळ तयार करण्यास मुभा दिली. त्यानंतर सन १९९८ साली मित्रमंडळ सूची शोधण्याची मूभा दिली. मात्र या संकेतस्थळाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. परंतु या संकेतस्थळाच्या निर्मितीआधी देखील या प्रकारचा ऑनलाईन संवाद अथवा देवाण-घेवाण घडत असे. प्रोफाईल व संवाद साधणे हे जरी या सेवेचे मूळ उद्दिष्ट असले, तरी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांची सुरुवात वेगवेगळ्या हेतूंनी झाली. उदा- सायवर्ल्ड हा कोरियन परिसंवाद मंच होता. स्कायरॉक ही सुरुवातीला फ्रेंच ब्लॉगिंग सेवा होती. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरील प्रत्येक सदस्याला आपल्या माहितीची काही प्रमाणात गुप्तता राखता येते. मात्र यांवर मर्यादा आहेत. उदा- फेसबुकवरील सदस्याने एखादे अ‍ॅप्लिकेशन वापरायच्या आधी एक सूचना येते. त्या सूचनेनुसार त्या सदस्याची माहिती व फोटो वापरण्याची परवानगी फेसबुकला दिली जाते. मात्र ही माहिती कशासाठी वापरणार याची कल्पना सदस्याला नसते. त्याचप्रमाणे फेसबुकवर एखाद्या सदस्याने जरी आपल्या फोटोंविषयी गुप्तता पाळली असेल, तरी त्या सदस्याचे नाव फेसबुकवर शोधले असता काही फोटो दिसतात. हे फोटो मुख्यत्वे त्या सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित करून त्यात सदस्याला टॅग केलेले असते. तसेच सर्व सदस्यांची सर्व माहिती त्या संकेतस्थळांवर साठवली जाते व अनेकदा मोठमोठ्या कंपन्यांना विकली जाते. त्यामुळे गुप्तता ही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांविषयीची मुख्य चिंता आहे.
१) प्रोफाईल- माहिती पान : जवळजवळ सर्व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा मूलभूत घटक म्हणजे माहिती पान होय. या पानावर त्या संकेतस्थळाच्या सदस्याची माहिती प्रकाशित केली जाते. उदा- नाव, वय, लिंग, व्यवसाय, निवास स्थान, आवडीनिवडी इत्यादी. अनेकवेळा सदस्य एखादा फोटो देखील प्रकाशित करू शकतो. ही सर्व माहिती त्या संकेतस्थळावर साठवली जाते. जर कोणी त्या सदस्यास अथवा त्याची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला तर ते माहिती पान त्या व्यक्तीस दिसते. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर अशी प्रोफाईल बनवण्यास किमान वयाची पात्रता लागते. ही पात्रता प्रत्येक संकेतस्थळानिशी बदलते. २) ओळख- संपर्क व मैत्री: सोशल नेटवर्क सेवेचा मुख्य उद्देश इंटरनेटवर संपर्क जाळे निर्माण करणे हा आहे. त्यामुळे सर्व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापर प्रामुख्याने इतर व्यक्तींशी ओळख व मैत्री करण्यात केला जातो. हा सर्व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा महत्त्वाचा घटक आहे. या संपर्कजाळ्याला प्रत्येक संकेतस्थळावर विविध नावांनी ओळखले जाते. उदा- फेसबुक, ओर्कुटवर यास फ्रेंड्स- मित्र असे म्हणतात. तर ट्विटरवर त्यास फॉलोवर्स- अनुयायी असे म्हटले जाते. ३) घोषणा व संदेश : या संकेतस्थळांवर संपर्क साधण्याचे मुख्य साधन म्हणजे घोषणा असते. प्रत्येक सदस्य कोणतीही घोषणा प्रकाशित करू शकतो. यास इंग्रजीत स्टेटस मॅसेज असे म्हणतात. सदस्याने प्रकाशित केलेल्या घोषणा त्या सदस्याच्या त्या संकेतस्थळावरील सर्व मित्रमैत्रिणींना दिसतात व हे मित्रमैत्रिणी त्यावर आपली मते मांडू शकतात. त्याचप्रमाणे एकमेकांना संदेश पाठवण्याची सोय देखील येथे उपलब्ध असते. ४) संवाद : सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा वापर संवाद साधण्यास म्हणजेच चॅट करण्यासाठी सुद्धा करतात. सोशल नेटवर्क सेवा सुरू होण्यापूर्वी देखील अशा प्रकारचे चॅटिंग इंटरनेटवर केले जात असे. ५) इतर तंत्रज्ञानाशी मेळ : या सेवेची व संकेतस्थळांची लोकप्रियता पाहता अनेक मोबाईल फोन कंपन्यांनी ही सेवा मोबाईलवरही उपलब्ध केली आहे. म्हणजेच सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर प्रवेश करणे संगणकापुरते मर्यादित नाही. मोबाईल फोनवरून देखील या संकेतस्थळांवर प्रवेश करता येतो. ६) ॲप्लिकेशन्स : माहिती पान व संपर्कजाळे यांखेरीज दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ॲप्लिकेशन्स होय. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे सदस्याला विविध ॲप्लिकेशन्सही पुरवतात. त्यांचा वापर करून सदस्याला आपले माहिती पान सजवता येते. आपल्या फोटोमध्ये बदल घडवता येतात, विविध खेळ खेळता येतात. ही ॲप्लिकेशन्स प्रत्येक संकेतस्थळानुसार बदलतात. एखाद्या संकेतस्थळाच्या लोकप्रियतेवर याचा खुप मोठा प्रभाव पडतो. ७) व्यावसायिक उपयोग : अनेक व्यावसायिक कंपन्या व संघटना या संकेतस्थळांचा वापर आपल्या कंपनीविषयी माहिती पुरवण्यास करतात. विविध कंपन्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवर आपले प्रोफाईल प्रकाशित करतात. ८) जाहिराती : सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांची लोकप्रियता व विस्तार पाहता अनेक व्यावसायिक कंपन्या व उद्योग धंदे या संकेतस्थळांचा वापर जाहिरातींसाठी सुद्धा करतात. उदा- इतर संकेतस्थळांच्या जाहिराती, बाजारातील नवीन वस्तूंच्या जाहिराती, नोकऱ्यांच्या जाहिराती इत्यादी. संकेतस्थळांना या जाहिरातदारांकडून प्रचंड पैसा मिळतो व त्यावरून ते नफा कमवतात.
बहुतेक वेळा अनेक लोक अशाच व्यक्तींशी ऑनलाईन मैत्री करतात, की ज्यांना ते प्रत्यक्षात ओळखतात किंवा कधी तरी भेटलेले असतात. तरीही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे प्रत्येक सदस्यास वेगवेगळ्या अनोळखी व्यक्तींशी देखील मैत्री करण्याची संधी देतात. सदस्यांचे संपर्कजाळे झळकवणे हा सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचा मुख्य गुणधर्म आहे. एखाद्या सोशल नेटवर्क सेवेचा पाया म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर तयार केलेले प्रोफाईल पान अर्थात माहिती पान असते. एखाद्या व्यक्तीचा इंटरनेटवरील आविष्कार किंवा रूप किंवा अवतार म्हणजे हे प्रोफाईल पान होय. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळे व्यक्तीला अशा प्रकारचे प्रोफाईल बनवणे, त्या संकेतस्थळांवरील इतर व्यक्तींशी ओळख व मैत्री करणे तसेच विविध माहितीची देवाण-घेवाण करणे आदींची संधी देतात. सोशल नेटवर्क सेवेमुळे एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्क व ओळख ठेवता येते. यात वेळ, स्थान इत्यादी गोष्टी आड येत नाहीत. मात्र या ओळखींचा प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग होतो की नाही, हे सांगणे कठीण आहे. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांवरील माहितीचा वापर अनेक कंपन्या, अर्थवित्तीय संस्था, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्या आदी करतात. अनेक वेळा या माहितीचा गैरवापरही केला जाऊ शकतो. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे वाढते जाळे व लोकप्रियता तसेच लोकांवर होणारा परिणाम हे अनेक अभ्यासकांचे लक्ष वेधत आहे. या वाढत्या लोकप्रियतेबरोबरच इंटरनेट व सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचे व्यसनही वाढत आहे. अल्पवयीन मुलांसह तरुणाई खेळाच्या अत्याधिक आहारी गेली आहे. ती सर्व आईवडील किंवा प्रिय व्यक्तीलाही जुमानत नाहीत. व्यत्यय आणला म्हणून प्राणघातक हल्ले केल्याच्या प्रसंगी जीव घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी तर अशा वेड्यापिस्या मुलांनी आत्महत्यांचाही पर्याय निवडला आहे, हे येथे चिंतनीयच!
!! गडविश्व न्यूज नेटवर्क परिवारातर्फे समाज माध्यमांचा उपयोग सामाजिक स्तर उंचावण्यासाठीच व्हावा, यास्तव सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी- अलककार.
(म.रा. डि.शै. दै.रयतेचा कैवारीचे लेख विभाग प्रमुख तथा जिल्हा प्रतिनिधी.)
गडचिरोली, भ्रमणध्वनी- ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here