मुंबईची चित्रमैफल राहीली अपुरी !

285

(दीनानाथ दलाल जयंती विशेष)

दलालांची चित्रे भारतीय संस्कृती व मातीशी नाते सांगणारी होती. आपल्या जीवनातले रंग घेऊनच ती नटलेली होती. त्यांची रेषा अत्यंत सशक्त आणि लवचीकही होती. तिच्यात जोरकस प्रवाहीपणही होते आणि हळुवार लयकारीची नजाकतही होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलींचे संस्कार त्यांच्या चित्रात दिसत. वास्तववादी चित्रणातील त्यांचे कसब वादातीत होते. अधिक माहिती कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे यांच्या या लेखातून जरूर वाचा.

दलालांची चित्रे भारतीय संस्कृती व मातीशी नाते सांगणारी होती. आपल्या जीवनातले रंग घेऊनच ती नटलेली होती. त्यांची रेषा अत्यंत सशक्त आणि लवचीकही होती. तिच्यात जोरकस प्रवाहीपणही होते आणि हळुवार लयकारीची नजाकतही होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलींचे संस्कार त्यांच्या चित्रात दिसत. वास्तववादी चित्रणातील त्यांचे कसब वादातीत होते. दीनानाथ दलालांना साहित्याची मनापासून आवड होती. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, प्रवासवर्णन, वैचारिक, विनोदी, ललित, ऐतिहासिक असे सर्व साहित्य प्रकार त्यांच्यासमोर येत व त्यांना योग्य ते न्याय देणारे चित्र ते साकारत. दीनानाथ दलाल यांचा जन्म मडगाव- गोवा येथे दि.३० मे १९१६ रोजी झाला. त्यांचे पूर्णनाव नृसिंह दामोदर दलाल नाईक असे होते. ते वाङ्‍मयीन पुस्तकांतील बोधचित्र आणि मुखपृष्ठ यांकरीता ख्यातनाम झालेले मराठी चित्रकार होते. सन १९३७मध्ये जी.डी.आर्ट ही परीक्षा उत्तीर्ण होताच दलालांच्या कारकिर्दीस सुरुवात झाली.
केतकर आर्ट इन्स्टिट्यूटमधील त्यांच्या विद्यार्थिनी व चित्रकर्त्री सुमती पंडित यांच्याशी सन १९४३ साली त्यांचा विवाह झाला. मीरा, अरुणा, प्रतिमा आणि अमिता या त्यांच्या चार कन्या होत. विवाहाच्या वर्षीच दलालांनी मुंबईत स्वत:चा दलाल आर्ट स्टुडिओ सुरू केला. प्रथम मौज प्रकाशनाच्या जिन्याखालील एका छोट्याशा खोलीत हा स्टुडिओ सुरू झाला. वर्षभरातच कामाचा व्याप वाढला आणि सन १९४४मध्ये मुंबईच्या केनेडी ब्रिजजवळील एका मोठ्या जागेत स्टुडिओचे स्थलांतर झाले. त्यांनी छोट्या रेखाटनापासून मोठी कथाचित्रे, मासिके, पुस्तके यांची मुखपृष्ठे, दिनदर्शिका- कॅलेंडर्स, व्यक्तिचित्रे, निसर्गचित्रे इत्यादी अनेकविध चित्रे रेखाटली. त्यामुळे ते अल्पावधीतच रसिकप्रिय चित्रकार बनले. दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करून त्यांनी मराठी प्रकाशन विश्‍वात पुस्तकांची मुखपृष्ठे, अंतरंगचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. अल्पावधीतच लोकांना त्यांच्या कामातील कलात्मक ताकदीचा परिचय होऊ लागला. मराठी पुस्तकांचा चेहरामोहरा बदलू लागला. कारण आता प्रकाशन विश्‍वात दलाल-पर्व सुरू झाले होते. नवे मराठी पुस्तक आणि दलालांनी रंगवलेले मुखपृष्ठ असे जणू समीकरणच झाले होते. त्या काळात दलाल नावाची मोहिनी मराठी रसिकांवर पडली होती.
दीनानाथ दलाल १९३८च्या सुमारास बा.द.सातोस्कर यांच्या सागर प्रकाशनासाठी काम करू लागले. मामा वरेरकर यांच्या वैमानिक हल्ला या पुस्तकासाठी दलालांनी पहिले मुखपृष्ठ केले. त्याच टिपणात नेमकेपणाने म्हटले आहे- पुस्तकाची मुखपृष्ठे व आतील चित्रे म्हणजे फक्त सजावट नसते, तर पुस्तकाचा आशय सदृश्य प्रतिमांनी समृद्ध करणारी, पुस्तकाला व्यक्तिमत्त्व देणारी, पुस्तकाशी संवादी अशी ती नवनिर्मिती असते. याची जाणीव दलालांच्या मुखपृष्ठांनी प्रथम दिली. इ.स.१९४५मध्ये दलालांनी दीपावली या वार्षिकाचा पहिला अंक प्रसिद्ध केला. दर्जेदार साहित्य व दलालांच्या उत्तमोत्तम चित्रांनी सजलेला दीपावली अल्पावधीतच लोकप्रिय झाला. रसिक आतुरतेने त्याची वाट पाहू लागले. हातांत व्यावसायिक कामे प्रचंड असूनही वेगळा वेळ काढून दलालांची स्वान्त सुखाय चित्रनिर्मिती चालू असे. भारतातील विविध चित्रप्रदर्शनांत त्यांचा सहभाग असे. दि बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात तेरा वेळा दलालांची चित्रे पुरस्कारप्राप्त ठरली. गोवा, हैदराबाद, अमृतसर येथील प्रदर्शनांमध्येही त्यांच्या चित्रांना पुरस्कार मिळाले. दलाल आर्ट स्टुडिओतर्फे प्रकाशित झालेली शृंगार नायिका, चित्रांजली, भारताचे भाग्यविधाते, अमृतमेघ ही सचित्र पुस्तके रसिकमान्य ठरली. सन १९७१मध्ये दीपावलीचा रौप्य महोत्सव समारंभ पार पडला. मुंबई येथे असताना वयाच्या ५४व्या वर्षी आपली चित्रमैफल अपुरी ठेवून दि.१५ जानेवारी १९७१ रोजी हे महान कलावंत निघून गेले, ते कधीही परत न येण्यासाठी कायमचेच!
!! चित्रकार दीनानाथ दलाल यांना व त्यांच्या कलाकौशल्यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

संकलन व सुलेखन –
कृगोनि- कृ. गो. निकोडे गुरूजी.
(भारतीय थोरपुरुषांचे जीवनचरित्र अभ्यासक)
रामनगर वॉ.नं.२०, गडचिरोली.
भ्र. ध्वनी क्र. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here