चार जहाल नक्षलींना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश 

1088

– १८ लाखांचे बक्षिस होते जाहीर,  नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठे यश

The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस दलास नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर मोठे यश प्राप्त झाले आहे. १८ लाख बक्षीस असलेल्या चार जहाल नक्षलींना भामरागड उपविभागाअंर्तगत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील नेलगुंडा जंगल परिसरातुन अटक करण्यात आल्याची कारवाई आज २१ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास करण्यात आली आहे.
बापू उर्फ रामजी दोघे वड्डे (३०) रा.नेलगुंडा ता. भामरागड, मारोती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधु गावडे (३४) रा. कनेली ता. धानोरा, सुमन उर्फ जन्नी कोटमी कुडयामी (२४) पडतमपल्ली ता. भामरागड, अजित उर्फ भरत रा. झरेवाडा ता.एटापल्ली जि. गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलींची नावे आहेत. अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलींवर एकुण १८ लाख रूपयांचे बक्षीस असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिली.

नक्षल्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास मोठे यश

नक्षल्यांच्या टीसीओसी सप्हाहाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलास गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे भामरागड पोलीस उपविभागा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र धोडराज हद्दीतील नेलगुंडा जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबविले. या दरम्यान चार जहाल नक्षलींना साध्या वेषभूषेत अटक करण्यात आली. विशेष म्हणजे कोणतीही चकमक न करता सदर चार जहाल नक्षलींना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील नक्षलींचा विविध गुन्हयामध्ये सहभाग 

अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षली बापू वड्डे हा  कंपनी क्र.१० मध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. १४ ऑगस्ट २०२० रोजी पोलीस मदत केंद्र कोठी अंतर्गत पोलीस शिपाई दुशांत नंदेश्वर यांच्या खुनामध्ये याचा सक्रीय सहभाग होता तसेच त्याचा ७ खुन, ३ चकमक, १  जाळपोळ, २ दरोडा अशा एकुण १३  गुन्हयामध्ये समावेश आहे. मारोती गावडे हा गट्टा दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. तसेच तो नक्षलच्या ॲक्शन टीमचा सदस्य होता. त्याचा एकुण 3 चकमकीच्या गुन्हयामध्ये समावेश आहे. सुमन कुडयामी ही पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तीचा ३ खुन व ८ चकमक अशा एकुण ११ गुन्हयामध्ये समावेश आहे.
१३ एप्रिल रोजी पोलीस मदत केंद्र गट्टा (जा) हद्दीमध्ये अशोक उर्फ नविन पेका नरोटे व मंगेश मासा हिचामी या दोन निरपराध आदिवासी नागरिकांच्या खुनाच्या कटामध्ये जहाल नक्षली मारोती उर्फ अंतुराम माणिक साधु गावडे व अजित उर्फ भरत रा. झारेवाडा ता.एटापल्ली जि.गडचिरोली यांचा सक्रीय सहभाग होता. या व्यतीरीक्त त्यांचा आणखी किती गुन्हयांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

अटक करण्यात आलेल्या नक्षलींवर १८ लाखाचे बक्षीस

नक्षली करवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरिता महाराष्ट्र शासनाने बापू उर्फ रामजी दोघे वड्डे याच्यावर ८ लाख रूपये, मारोती उर्फ अंतुराम उर्फ माणिक साधु गावडे याच्यावर ६ लाख, सुमन उर्फ जन्नी कोमटी कुडयामी हीच्यावर २ लाख व अजित उर्फ भरत याच्यावर २ लाख रूपये असे एकुण १८ लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या व्यतीरीक्त त्यांचा आणखी किती गुन्हयांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

२०२२ सालात १९ नक्षलींना अटक

गडचिरोली पोलीस दलाने २०२१ सालात १४ नक्षलींना अटक केली आहे तर २०२२२ या सालात केवळ ४ महिण्यात १९  नक्षलींना अटक केली आहे हे विशेष.

सदर करावाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या नेतृत्वात पार पडली.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले असून नक्षल्यांनी नक्षली हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे असे आवाहन पत्रकार परिषदे दरम्याने केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here