गडचिरोलीत वॉटर लेट्यूस नावाच्या पानवनस्पतीचा कहर : मत्स्यव्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान

367

The गडविश्व
गडचिरोली : मागील काही वर्षांत देशभरात इकॉर्निया वनस्पतीने घातलेला धुमाकूळ अद्याप संपला नसतानाच वॉटर लेट्यूस नावाच्या एका नव्या पाणवनस्पतीने गडचिरोली शहरातील चिंताळा तलावात शिरकाव केला आहे. या वनस्पतीच्या वाढीचा वेग इतका जलद आहे की, अवघ्या आठ दिवसांत या वनस्पतीने संपूर्ण तलाव झाकला. त्यामुळे पाण्यात मासे मृत्यूमुखी पडले असून येथे मत्स्यपालन करणाऱ्या वाल्मिकी मत्स्यपालन सहकारी संस्थेचे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गडचिरोली शहरातच असलेल्या चिंताळा तलावात वॉटर लेट्यूस म्हणून ओळखली जाणारी व पिस्टीया स्ट्रॅटिओटेस असे शास्त्रीय नाव असलेली ही पाणवनस्पती मत्स्यपालन संस्थेच्या सदस्यांना पंधरा दिवसांपूर्वी आढळली होती. तेव्हा ही वनस्पती तलावाच्या एका कोपऱ्यात अत्यल्प प्रमाणात होती. त्यामुळे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. मात्र, अचानक अवघ्या आठ दिवसांत या वनस्पतीने संपूर्ण तलावच झाकून टाकला. पुरेसा सूर्यप्रकाश व ऑक्सिजन न मिळाल्याने तलावातील मासे व इतरही जीवही मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडत आहेत. मत्स्यपालन संस्थेने जून महिन्यात येथे रोहू, कतला, ग्रासकार्प या प्रजातींचे मत्सबिज सोडले होते. आता हे मासे मोठे होऊन जवळपास एक किलोपर्यंत झाले असताना अचानक या पाणवनस्पतीमुळे तलावातील संपूर्ण जैवविविधताच धोक्यात आली आहे. त्यामुळे येथील मासेमारांचे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती या मत्स्यपालन सहकारी संस्थेचे सदस्य तथा ढिवर-भोई समाजाचे अध्यक्ष उमाजी गेडाम यांनी दिली.
दरम्यान गडचिरोली वनविभागाचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी या तलावाला भेट देत संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच या उपद्रवी वनस्पतीबद्दल मासेमारांना सविस्तर मार्गदर्शन करून महत्त्वाच्या सूचना केल्या. यावेळी मानद वन्यजीव रक्षक मिलिंद उमरे, निसर्गमित्र अजय कुकडकर, नीलेश पटले आदी उपस्थित होते. जिल्ह्यात इतर ठिकाणी ही वनस्पती आढळली आहे काय, याचा शोध घेतला जाणार असून यासंदर्भात जनजागृतीची आवश्यकता असल्याचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी सांगितले आहे.
वॉटर लेट्युस, वॉटर कॅबेज, नाईल कॅबेज, शेल फ्लॉवर अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचे शास्त्रीय नाव पिस्टीया स्ट्रॅटिओटेस (Pistia stratiotes) असे आहे. आफ्रिका खंडातील ज्या व्हिक्टोरिया तलावातून पांढऱ्या नाईल नदीचा उगम होतो त्या तलावात ही वनस्पती सर्वप्रथम आढळून आली. हिची पाने कोबीसारखी असल्याने हिला नाईल कॅबेज हे नाव देण्यात आले. अतिशय आक्रामक पद्धतीने वाढणारी ही पाणवनस्पती जगभर पसरत आहे. ताज्या गोड्या पाण्यात ही वनस्पती वेगाने वाढते. इतर स्थानिक प्रजातींना वाढू देत नाही. संपूर्ण जलाशय झाकला गेल्याने तलावातील जलचर व इतर जैवविविधता नष्ट होते. त्यामुळे ही वनस्पती पाण्यातील जैवविविधतेवर खूप मोठे संकट आहे. विशेष म्हणजे या वनस्पतीच्या पानांच्या खालच्या भागात डास अंडी घालतात व वाढतात. त्यामुळे त्यांची संख्या वाढून अनेक आजारांना निमंत्रण मिळते.

‘‘ ही वनस्पती जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळून आली असून जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय घातक आहे. त्यामुळे जलाशयात कुठेही ही वनस्पती दिसताक्षणी तिचा नायनाट करणे गरजेचे आहे. ती मोठ्या प्रमाणात वाढली की मग तिला नष्ट करणे त्रासदायक ठरते. ही परदेशी वनस्पती असून भारतात यावर प्रभावी जैविक नियंत्रक सध्या आढळून आलेला नाही. त्यामुळे मत्स्यपालक, मासेमारांमध्ये जनजागृती करून या वनस्पतीची वेळीच विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

– डॉ. किशोर मानकर, वनसंरक्षक, वनविभाग, गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here