आष्टीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

2

आष्टीत दोन दुचाकींची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मंगळवारी (ता. १०) चामोर्शी मार्गावरील एचपी पेट्रोलपंपासमोर ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजू येलमुले आणि त्यांचा मुलगा संदीप येलमुले हे अनखोडा येथून दुचाकीने आष्टीकडे येत होते. तर शाम बिस्वास हे आष्टीहून आपल्या गावाकडे जात होते. दरम्यान, पेट्रोलपंपासमोर दोन्ही दुचाकींची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, राजू येलमुले आणि शाम बिस्वास यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात संदीप येलमुले गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच आष्टीचे पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून जखमी संदीप याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले. या घटनेमुळे आष्टी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here